अब्दुल सत्तार भाजपसोबत आल्यास आपले काय ?; सिल्लोड भाजप पक्षासमोर पेच | पुढारी

अब्दुल सत्तार भाजपसोबत आल्यास आपले काय ?; सिल्लोड भाजप पक्षासमोर पेच

सिल्‍लोड : पुढारी वृत्तसेवा; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये सिल्‍लोड- सोयगावचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा समावेश आहे. बंडखोर आमदार भविष्यात भाजपसोबत आल्यावर आपले काय? असा पेच सध्या तरी या मतदार संघातील भाजपमधील इच्छुकांसमोर निर्माण झालेला आहे. सध्या तरी तालुक्यात या राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आलेले असून राज्यातील
राजकारणाकडे सर्वांचेच लागून आहे.

या मतदार संघात अब्दुल सत्तार विरुध्द भाजप असेच राजकारण राहिलेले आहे. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा समावेश असल्याने मतदार संघातील भाजपमधील इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. राज्यातील शिवसेनेतील बंडाळीने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे.

गल्‍ली- गल्‍लीत राज्यातील राजकारणाची चच रंगलेली आहे. अब्दुल सत्तारांची तीन वर्षांत ही पक्षाशी दुसर्‍यांदा बंडाळी आहे. यापूर्वी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील मतभेदांमुळे त्यांनी पक्षाच्या (काँग्रेस) उमेदवाराविरोधात खुला प्रचार केला होता. यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक भाजपच्या पदाधिकार्‍यांमधून कडाडून विरोध झाला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केला व भाजपचा मतदार संघ शिवसेनेला सोडवून घेत येथील इच्छुकांची कोंडी केली होती. अशीच राजकीय कोंडी आता पुन्हा या मतदार संघातील भाजपमधील इच्छुकांची होण्याची चिन्हे आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षातील बंडखोरीत सहभागी होत भाजपशी जवळीक वाढवल्याने स्थानिक भाजपसाठी ही बाब डोकेदुखीची ठरणारी आहे.

राज्यातील या राजकीय उलथापालथीचे पडसाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या मतदार संघात दिसून येणार आहेत. सध्या तरी भाजपमधील इच्छुकांचे देव पाण्यात आहे, हे मात्र नक्‍की. येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

– राजू वैष्णव

सावध भूमिका

राज्यातील राजकारणाचे पडसाद या मतदार संघात चांगलेच उमटत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर अब्दुल सत्तार समर्थक आम्ही साहेबांसोबत अशी पोस्ट व्हायरल करीत त्यांच्या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. तर पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार असल्याने भाजप पदाधिकारी मात्र सावध भूमिका घेत राजकीय भाष्य टाळत आहे.

राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर याचा आम्हाला आनंदच आहे. खर पाहिल तर अडीच वर्षांनंतर मिळणारी राजकीय कलाटणी राज्यात आज पहायला मिळत आहे. मतदार संघातील स्थानिक राजकारणातील निर्णय हे पदाधिकारी, कार्यकत्र्यांच्या बैठकीत ठरवले जातील. तरी देखील पक्ष आदेश आमच्यासाठी अंतिम राहील.
-ज्ञानेश्वर तायडे (तालुकाध्यक्ष भाजप, सिल्लोड)

हेही वाचलंत का? 

Back to top button