औरंगाबाद : पोलिसांना चाकू दाखविणारे कोठडीत | पुढारी

औरंगाबाद : पोलिसांना चाकू दाखविणारे कोठडीत

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : सेव्हन हिल्स येथील वाहतूक सिग्नलवर बुधवारी (ता. 22) वाहन अडवल्याने वाहतूक पोलिस कर्मचार्‍यावर चाकू हल्‍ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना प्रथम वर्ग न् यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शनिवारी (ता. 25) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मोहम्मद सिद्दीकी खालेद चाऊस (32, सईदा कॉलनी, जटवाडा रस्ता) आणि सय्यदी सलमान सय्यद सऊद (22, रा. गल्‍ली नं. 3 रहिमनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस शिपाई भीमराव लक्ष्मण फलटणकर हे सहकार्‍यांसह सेव्हन हिल्स परिसरात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी एक विना क्रमांक डबल सीट दुचाकी जात असताना संशय आल्याने शिपाई फलटणकर यांनी दुचाकी थांबवून कागदपत्रांची चौकशी केली. त्यावेळी वाद घालत पाठीमागे बसलेल्याने कमरेचा चाकू काढून फलटणकर यांच्यावर हल्‍ला करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. अटकेतील दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयात सरकारी वकील समिर बेदरे यांनी काम पाहिले.

दहशत निर्माण करणारे अटकेत

मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या दोघांना शुक्रवार (ता. 24) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश पी. एस. मुळे यांनी दिले आहेत. विजय रमेश काळे (28, रा. पार्वतीनगर, बेगमपुरा) आणि आनंद संजय अहिरे (22, रा नक्षत्रवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

मिलिंद महाविद्यालयाजवळ बुधवारी (ता. 22) दुपारी तीन व्यक्‍ती दुचाकीवरून धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती सहाय्यक उपनिरीक्षक मनीषा हिवराळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने धाव घेऊन दोघांना जागीच पकडले. तर अन्य आरोपी संधी साधून दुचाकीसह (क्र. एमएचटीइटी- 2032) पसार झाला. अटक केलेल्यांच्या ताब्यातून पोलिसांनी लोखंडी कोयता जप्त केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button