औरंगाबाद : पाणीचोरांची नावे लपवल्यास गुन्हे नोंदवू | पुढारी

औरंगाबाद : पाणीचोरांची नावे लपवल्यास गुन्हे नोंदवू

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महापालिका पाणीपुरवठा विभागाला वारंवार सूचना देऊनही मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळ कनेक्शनची यादी सादर होत नसल्याने विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर संतापले आहेत. गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आठवडाभरात पाणीचोरांची यादी सादर करा, नसता संबंधित अभियंत्यांवरच गुन्हे दाखल करीन, असा इशारा दिला आहे. दीड तास चाललेल्या या बैठकीत संपूर्ण मनपा अधिकार्‍यांसह नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराची कानउघाडणी करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेशही दिले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, विभागीय उपायुक्‍त जगदीश मिनीयार यांच्यासह जलकुंभावर नियुक्‍त केलेले 31 वरिष्ठ अधिकारी, मनपा पाणीपुरवठा विभाग, एमजेपीचे अधिकारी असे 50 कर्मचारी उपस्थित होते. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व जलकुंभातील पाण्याचे ऑडिट करण्यासाठी विभागीय आयुक्‍त केंद्रेकर यांनी 12 जूनला 31 वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्‍ती केली. त्या सर्वांनी सादर केलेल्या अहवालावर ही बैठक झाली. यात सुरुवातच मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळ जोडणीपासून झाली.

त्यांची गय करणार नाही

मनपा अभियंते वारंवार सूचना देऊनही अवैध नळ जोडणीची यादी का सादर करीत नाहीत, असा सवाल केंद्रेकर यांनी उपस्थित केला. पाणीचोरांना जे कोणी वाचवीत असतील, त्यांची गय केली जाणार नाही. येत्या आठ दिवसांत अभियंत्यांनी ही यादी सादर करावी. नसता जलकुंभावर नियुक्‍त 31 वरिष्ठ अधिकारी ही माहिती गोळा करतील अन् त्यानंतर संबंधित अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले जातील.

पुढील आठवड्यापासून 4 दिवसांआड पाणी

शहराला हर्सूल तलावातून 10 ते 15 एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हर्सूलला एन 5 जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. आठ दिवसांत शहागंजहून होणारा पुरवठाही बंद केला जाणार आहे. त्यासोबतच ढोरकीनमधील सम्पचे कामही पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल, असेही बैठकीत ठरले.

193 कोटींचा प्रस्ताव तयार… जूनी 700 मि.मी. व्यासाची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्याठिकाणी 900 मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार मनपा व एमजेपीच्या अधिकार्‍यांनी 193 कोटींचा प्रस्ताव तयार करून तोविभागीय आयुक्‍तांना सादर केला. शुक्रवारी हा प्रस्ताव मुख्य सचिवांना दिला जाणार आहे

कामाची गती वाढवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतरही नवीन पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीचे काम धिम्या गतीनेच सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी केंद्रेकर यांनी ठेकेदार एजन्सीला नोटीस बजावण्याचे निर्देश मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना दिले. जलकुंभाच्या कामासाठी केवळ 170 मजूरच असून, ते 400 पर्यंत वाढवा. मुख्य जलवाहिनीचे काम केवळ 60 मीटर पूर्ण झाले. तातडीने त्याची गती वाढवून उपलब्ध 810 मीटरचे पाइप टाका, असे निर्देश त्यांनी दिले.

Back to top button