औरंगाबाद : समोर हॉटेल अन् मागे बनावट दारूचा अड्डा | पुढारी

औरंगाबाद : समोर हॉटेल अन् मागे बनावट दारूचा अड्डा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : समोर हॉटेल अन् पाठीमागे चक्‍क बनावट दारूचा अड्डा सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईनंतर ही बाब समोर आली. त्यावरून तीन ठिकाणी छापे मारून बनावट रॉयल स्टॅगचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोघांना अटक केली असून, एकजण पसार झाला आहे. अटकेतील आरोपींची पोलिस कोठडीनंतर हर्सूल न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली. रौनक रवींद्र जैस्वाल आणि राजेंद्र तोताराम सावळे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे.

अधिक माहितीनुसार, बिअर शॉपीतून केवळ बिअर अन् वाइनची विक्री करता येते. मात्र, सिल्‍लोड न्यायालयासमोर असलेल्या आर. एम. बिअर शॉपीतून चक्‍क दारूची आणि तीही बनावट दारूची विक्री होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने नुकताच छापा मारला. तेथून 47 हजार 77 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रौनक जैस्वाल याला ताब्यात घेतले.

त्याच्या कबुलीनंतर त्याच्याच मालकीच्या डोंगरगाव फाटा (ता. सिल्‍लोड) येथील हॉटेल स्वागत येथे छापा मारला. तेथे तपासणी केल्यावर आणखी बनावट दारू आढळली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. यश परमिट रूममध्येही तेच रौनक जैस्वालने दिलेल्या कबुली जवाबानंतर भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे, निरीक्षक एन. ए. डहाके, दुय्यम निरीक्षक एस. बी. रोटे, ए. ई. तातळे, एस. एस. पाटील, एस. डी. घुले, जवान सर्वश्री युवराज गुंजाळ, रवींद्र मुरडकर, एस. एम. कादरी, सुभाष गुंजाळे, मयूर जैस्वाल, किशोर ढाले, सचिन पवार, अमोल अन्नदाते यांच्या पथकाने निल्‍लोड फाटा येथील यश परमिट रूमवर छापा टाकला.

तेथील हॉटेल चालक राजेंद्र सावळे याच्या ताब्यातून 16 हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली. सावळे याला लगेचच ताब्यात घेण्यात आले. 22 पोती भरून रिकाम्या बाटल्याहॉटेल स्वागतच्या परिसरात भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. तेथे समोर हॉटेल आणि पाठीमागे एक पत्र्याचे शेड आढळले. त्यात 22 पोती भरून रॉयल स्टॅगच्या रिकाम्या चार हजार 400 बाटल्या आढळल्या याशिवाय 200 लिटरचे तीन रिकामे बॅरल होते. त्यातून स्पिरिटचा वास येत होता. तेथेच एक दुचाकीही आढळून आली. हा सर्व मुद्देमाल पथकाने जप्त केला.

 परवाना रद्दचा प्रस्ताव पाठविणार… बिअर शॉपीतून

केवळ बिअर आणि वाइनची विक्री करता येते. दारूची विक्री करता येत नाही, परंतु आर. एम. बिअर शॉपी आणि यश बिअर शॉपीतून चक्‍क बनावट दारूची विक्री होत असल्याचे समोर आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे हे या बिअर शॉपींचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पाठविणार आहेत, असे रोकडे यांनी सांगितले.

Back to top button