औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनाने चिमुरडीला चिरडले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलेल्या उस्मानाबाद येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या चारचाकी वाहनाने पाच वर्षीय चिमुरडीला चिरडले. यात ती चिमुरडी गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.९) रात्री सभा संपवून माघारी जाताना औरगाबाद येथील एपीआय कॉर्नर येथे झाला. मृत मुलीचे नाव विवा राऊत (रा. एन-6, सिडको) असे आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मराठवाड्यातून वाहने भरून पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मतदारसंघातून वाहनातून नागरिक आणले होते. सव्वा नऊ वाजता सभा संपल्यानंतर सर्व वाहने पुन्हा आपल्या गावाकडे रवाना झाले. यात एक वाहन क्रांतिचौकाकडून विमानतळाच्या दिशेने निघाले. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, एक चारचाकी वाहन अत्यंत वेगात जात होते. एपीआय कॉर्नर येथे एक दाम्पत्य मोपेडवरून जात होते. त्यांच्या सोबत 5 वर्षीय विवा होती. वेगात असणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या मोपेडला उडविले. ही धडक अत्यंत भीषण होती. त्यात चिमुकली लांब फेकली गेली. त्यानंतर चारचाकी वाहनाची दोन्ही चाके तिच्या अंगावरून गेली.

या अपघातात विवा ही गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत स्थानिकांनी सेव्हनहिल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्या चमुकलीचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्या चारचाकी वाहनात भगवी मफलर घातलेले तरुण होते असे सांगितले. वाहनाच्या चालकाला लोकांनी तत्काळ पकडले. दरम्यान, एमआयडीसी सिडको पोलिसांनी वाहन चालकासह त्यातील प्रवाशांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

Exit mobile version