औरंगाबाद : अभियंता तरुणीकडून कंपनीच्या ‘डेटा’ची चोरी; १४ कोटीला घातला गंडा | पुढारी

औरंगाबाद : अभियंता तरुणीकडून कंपनीच्या ‘डेटा’ची चोरी; १४ कोटीला घातला गंडा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वाळूज एमआयडीसीतील इन्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीतील अभियंता तरुणीने क्लच डिझाईन, इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी विकसीत केलेला इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन (EPT) डेटा चोरी केला. याद्वारे तिने कंपनीला तब्बल १४ कोटी ४७ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी १९ मे रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवानी कुरूप (वय २६, रा. समर्थनगर) असे आरोपी तरुणीचे नाव आहे.

हा प्रकार २२ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२१ या काळात घडला. विशेष म्हणजे, कंपनीने दहा वर्षांपेक्षा अधिक कलावधीत हा डेटा विकसीत केला होता. शिवानी या कंपनीत डिझायनर म्हणून नोकरी करीत होती. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक रोहित महेंद्र साळवी (वय ३६) यांनी याबाबतची फिर्याद दिली. गतवर्षी २२ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधीत आरोपी शिवानी ही सुद्धा या कंपनीत कार्यरत होती.

दरम्यान, शिवानी कुरूप हिने एप्रिल २०२१ मध्ये आयआयएम, अमृतसर संस्थेतून एमबीए अभ्यासक्रम करण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली होती. २९ मे २०२१ रोजी तिने कंपनीला दिलेल्या लेखी हमीपत्राच्या आधारे कंपनीने तिला परवानगी दिली होती. परंतु, तिला काही अटी घालण्यात आल्या होत्या. यात कंपनीचा डेटा या संस्थेशी शेअर करणार नाही, तिच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही आणि ती कंपनीच्या अचारसंहितेचे पालन करेल, या अटींचा समावेश होता. परंतु, आयटी विभागाने केलेल्या तपासणीत शिवानी हिने कंपनीने दिलेल्या मेल आयडीवरून स्वत:च्या मेल आयडीवर कंपनीचा डेटा हस्तांतरीत केल्याचे समोर आले. तसेच, हा डेटा तिने एमबीए अभ्यासक्रमात वापरला. तेथून हा डेटा स्पर्धक कंपन्यांना गेल्याचा संशय इन्ड्यूरन्स व्यवस्थापनाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करित आहेत.

स्पर्धक कंपनीला होऊ शकतो फायदा

शिवानीने चोरलेल्या डेटाचा गैरवापर सुरु झाला तर स्पर्धक कंपनी याची कॉपी करून स्वत:च्या मालकीची उत्पादने सुरू करू शकतात. तसेच, त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारू शकतात. ज्यामुळे इन्ड्यूरन्स कंपनीचे कधीही भरून न निघणारे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा शिवानीला आर्थिक फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवानीने चोरलेल्या डेटाची अंदाजे किंमत १४ कोटी ४७ लाख एवढी आहे. ती कदाचित जास्तही असू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा  

Back to top button