औरंगाबाद : 'संभाजीनगर'चा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही; आरोग्यमंत्री टोपे | पुढारी

औरंगाबाद : 'संभाजीनगर'चा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही; आरोग्यमंत्री टोपे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहे. परंतु असे असतानाच संभाजीनगर हा विषय राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर सध्या तरी नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन येथील जनता दरबारानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पिण्याचे पाणी, रस्ते, वीज हे प्रश्न अधिक महत्वाचे असून त्यावर सरकार काम करीत आहे, असेही ते म्हणाले. मात्र, टोपे यांच्या या वक्तव्यावरून सेनेच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी राष्ट्रवादीचे नेते तथा आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली हा दरबार हडकोतील राष्ट्रवादी भवनात पार पडला. यात अनेक नागरिकांसह कार्यकर्त्यांनी विविध वॉर्डातील समस्या लेखी स्वरूपात टोपे यांच्याकडे सादर केल्या. दोन तासात ५१ तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. दरबार आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर ते म्हणाले की, लवकरच शहरवासियांची यातून सूटका होणार आहे.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाच्या मुद्यावर बोलताना टोपे म्हणाले की, मूळात हा विषय आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर सध्या तरी नाही. राज्यात पाणी, रस्ते आणि नियमित वीज पुरवठा या समस्या अधिक महत्वाचे आहेत. त्या सोडविणे गरजेचे असून त्यावर राज्य सरकार काम करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री, नेते संभाजीनगर असा उल्लेख करतात. त्यात त्यांना निश्चितच आंनद वाटत असेल. इतरही लोक त्यांच्या सोयीनुसार अधूनमधून तसा उल्लेख करतात, असेही ते म्हणाले. टोपे याच्या या वक्तव्यामुळे मात्र आता शिवसेना पुन्हा संभाजीनगरवरून अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोणी कुठे भेट द्यावी..तो त्यांचा प्रश्न

दरम्यान, एमआयएमचे नेते आमदार अकबरोद्दीने ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीला दिलेल्या भेटीबाबत बोलतांना टोपे म्हणाले की, कोणी कुठे भेट द्यावी, कुठे जावावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलने टाळले.

हेही वाचा

Back to top button