औरंगाबाद पंचायत समिती : उपसभापतींना काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद पंचायत समिती चे नवनियुक्त उपसभापती अर्जुन शेळके यांना सोमवारी (दि. 2) दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत अर्जुन शेळके यांनी काँग्रेसशी गद्दारी करत भाजपमध्ये प्रवेश करून उपसभापतिपद मिळवले होते. या रागातून ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

29 जुलै रोजी उपसभापती निवडीसाठी झालेल्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सदस्य अर्जुन शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, भाजपने त्यांना उमेदवारी दिली.

अधिक वाचा :

निवडणुकीत काँग्रेसच्या सभापती छाया घोगरे, सुभाष भालेराव आणि एक अपक्ष अशी काँग्रेसची चार मते फुटल्याने काँग्रेसचे उपसभापती पदाचे उमेदवार अनुराग शिंदे यांना हार पत्करावी लागली होती. भाजपच्या या राजकीय खेळीने काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला.

उपसभापती शेळके हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पंचायत समितीतील त्यांच्या दालनात बसलेले होते. काँग्रेसचे अनुराग शिंदे हे कार्यकर्त्यांसह दालनात गेले.

अधिक वाचा :

दोघांमध्ये हमरीतुमरी झाली आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने एकच गोंधळ उडाला. मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे पंचायत समितीत पोहोचले.

त्यांनी शेळके व कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. यानंतर कार्यकर्त्यांनी शेळके यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे निमित्त करत शेळके यांना मारहाण करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपसभापतीच्या निवडणुकीतील गद्दारीचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा :

Back to top button