औरंगाबाद : करोडपतींना ‘रोडपती’ बनविणारा ३०:३० घोटाळा नेमका आहे तरी काय? | पुढारी

औरंगाबाद : करोडपतींना 'रोडपती' बनविणारा ३०:३० घोटाळा नेमका आहे तरी काय?

औरंगाबाद, गणेश खेडकर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या विशाल फटेने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने शेकडो लोकांना गंडविल्याचे प्रकरण ताजे असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील मुंडवाडी तांडा (ता. कन्नड) येथील संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड याने २० ते ६० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याच्या आमिषाने जवळपास पाच हजार लोकांची तब्बल पाचशे कोटी रुपयांना फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.

२१ जानेवारीला त्याला गजाआड केल्यानंतर पोलिसांना घरझडतीत एक डायरी सापडली. त्यात ३०० हून अधिक गुंतवणुकदारांची नावे आहेत. दहा लाख ते अडीच कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची यात नोंद असून सर्वाधिक ६० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे कबुल केल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. आरोपी संतोष राठोड सध्या बिडकीन पोलिसांच्या कोठडीत असून ३१ जानेवारीपर्यंत त्याला कोठडी सुनावलेली आहे.

औरंगाबादच्या बिडकीन परिसरात २०१४-२०१५ वर्षी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आले. बिडकीनसह पाच गावांतील २ हजार ९११ शेतकऱ्यांची २ हजार ३५१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना २३ लाख रुपये प्रति एकरचा मोबदला मिळाला. त्यामुळे या भागातील लोक रातोरात करोडपती झाले. घरासमोर आलिशान गाड्या आणि नवनवीन बंगले बनू लागले. अशातच या भागात संतोष राठोड व त्याच्या टोळीने पैसे दामदुप्पट करून देणारी ‘तीस-तीस’ योजना आणली. गुंतवणूक केलेल्या पैशाला महिन्याला २०, २५ आणि ३० टक्के परतावा देण्याचे त्याने आमिष दाखविले. जमिनीचा कोट्यवधी रुपये मावेजा लोकांना मिळाला होता. बँकेत पैसे ठेवून वाढणार नाहीत, अशी भिती दाखवून राठोडच्या टोळीने पैठण तालुक्यातील बिडकीन, बोकूड जळगाव, पाटोदे वडगाव, चिंचोली, जांभळी, निलजगाव, जांभळी तांडा, बंगाली तांड्यासह कन्नड, मुंडवाडीच्या शेकडो लोकांना आमिष दाखविले. नातेवाईक, शेजारी, मित्र, जवळचे, अशा सर्वांनी गुंतणुकीला सुरुवात केली.

सुरुवातीला अनेकांना परतावा मिळाला. मिळालेला परतावादेखील लोकांनी पुन्हा त्याच्याकडेच गुंतविला. पैसे मिळत गेल्यामुळे आणि दामदुप्पटच्या अमिषाला बळी पडून लोकांनी शेकडो कोटींची गुंतवणूक केली. काहींनी स्वत:ची घरे गहान ठेवून तर काहींनी कमी व्याजाने पैसे काढून अधिकच्या व्याजाच्या हव्यासापोटी आरोपींच्या घशात घातल्याचे वास्तव आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी कोट्यवधीचे धनी असलेल्या लोकांकडे आज अक्षरशः आठवडी बाजारासाठी पैसे नाहीत. ही वेळ आलीय बहुचर्चित ‘तीस-तीस’ घोटाळ्यामुळे. आज या लोकांवर रोजंदारीने कामावर जाण्याची परिस्थिती ओढवली.

अन् घोटाळ्याला वाचा फुटली

१६ नोव्हेंबर २०२१ रोजी ज्योती रघुनाथ ढोबळे (रा. जांभळी, ता. पैठण) या महिलेने बिडकीन ठाण्यात पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आरोपीचे धाबे दणाणले. त्याने रात्रीतूनच ढोबळे यांना दहा लाख रुपये परत केले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी ढोबळे यांनी न्यायालयात शपथपत्र देत काहीही तक्रार नसल्याचे लिहून दिले होते. त्यानंतर काही दिवस वेगवेगळे वायदे देऊन दिवस काढले. मात्र, पैसे मिळत नाहीत, हे लक्षात आल्यावर शुक्रवारी (२१ जानेवारी) अखेर दौलत जगन्नाथ राठोड नावाच्या व्यक्तीने बिडकीन ठाण्यात तक्रार दिली. आरोपी राठोडने ३३ लाखांची फसवणूक केल्याचा त्यांनी गुन्हा नोंदविला. त्यानंतर बिडकीनसह ग्रामीण पोलिसांनी लगेचच राठोडचा शोध सुरू करीत रात्री त्याला गजाआड केले.

का पडले ३०:३० नाव?

सर्वसामान्यांना ३०:३० घोटाळा म्हणजे नेमके काय? असा प्रश्न पडतो. तर, ३०:३० म्हणजे मास्टरमाइंड संतोष राठोडसह तब्बल ३० जणांचे टोळके. त्यांनी ३० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणुकीसाठी लोकांना भुरळ घातली. तीस लाख रुपये गुंतविले तर वेगळी ऑफर देऊ केली. सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्यांना फॉर्च्यूनर, क्रेटा, इनोव्हा, तवेरा सारख्या महागड्या गाड्या देऊ केल्या. विशेष म्हणजे, या गाड्यांचे क्रमांक देखील आरटीओतून ३०३० असेच घेऊन दिले. मास्टरमाइंड राठोडच्या मोबाइलच्या क्रमांकात शेवटचे आकडे ३०३० आहेत. त्याच्या गाड्यांचे क्रमांक देखील ३०३० आहेत. जो दलाल ३० जणांची गुणवणूक करेल, त्याला विशेष बक्षीसी दिली जायची, अशा अनेक प्रकारे केवळ ३०:३० आकड्यांवर ही योजना सुरु होती. त्यामुळे याला ३०:३० घोटाळा म्हटले जाते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

कोलकाता कनेक्शन व्हाया नाशिक

संतोष राठोडच्या माहितीवरून त्याचा नातेवाईक राजेंद्र देविदास पवार (रा. रोहिदासनगर, सातारा परिसर) याच्‍याकडून पैशांचा हिशोब असलेल्या तीन डायऱ्या पोलिसांनी जप्‍त केल्या. आरोपीने लोकांना गंडा घालून जमा केलेले पैसे मित्र शकील लियाकत (शंकरनगर, नाशिक) याच्‍याकडे ठेवल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी शकील लियाकत याच्‍या घराची झडती घेतली मात्र, तेथे काहीच सापडले नाही. धक्कादायक म्हणजे, शकील लियाकतच्या मार्फतीने राठोडने पुढे कोलकाता येथील सुशील यादव पटेल याच्याकडे गुंतवणूक केल्याचा सूत्रांचा दावा आहे. पुढे तपासात पोलिस थेट कोलकाता येथेही जाऊ शकतात.

दोन आरोपी आणखी मोकाटच

दौलत जगन्‍नाथ राठोड (रा. निलजगाव फाटा, बिडकीन ता. पैठण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष राठोडसह कृष्ण एकनाथ राठोड आणि पंकज शेषराव चव्हाण हे आरोपी आहेत. कृष्णा आणि पंकज यांच्या माध्यमातूनच दौलत यांनी संतोष राठोडकडे ३३ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. पोलिसांनी संतोष राठोडच्या मुसक्या आवळल्या परंतु, कृष्णा व पंकज मात्र, अजून मोकाटच आहेत. पोलिस त्यांना का अटक करीत नाहीत, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button