वडीगोद्री : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. शनिवारी मतमोजणी होणार आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार? याबाबत तर्क लावले जात आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना याबाबत विचारले असता, आम्ही मैदानात नव्हतो, त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही. जर मी मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असता. राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे. आता निवडणूक विषय संपलेला आहे. मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढून टाकला आहे आणि आता आरक्षणाची लढाई सुरू होणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. सरकार स्थापन झाले की, आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचेही मनोज जरांगेंनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
राज्याच्या वतीने आपण सामूहिक उपोषण करत आहे, त्याची सर्वजणांनी तयारी करावी. उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाली की, घोषित करणार आहोत. गावात कुठेही आमरण उपोषण करायचं नाही. आमरण उपोषण आंतरवाली सराटी मध्येच करायचे आहे. आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केलं आहे. त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणीत उभे राहायचे असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.