नागपूर : विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या सरासरी ५ टक्के मतांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील १२ जागांवर महायुती, महाविकास आघाडीत कुणाला धक्का, कुणाला लॉटरी लागणार याबाबत आज सकाळपासून वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत. उमेदवार, पदाधिकारी आणि त्यांचे पोल मॅनेजर्स दिवसभरात बूथ पातळीवर, आढावे मांडण्यात व्यस्त होते.
नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, भाजपचे कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते यांच्यासह प्रवीण दटके, बंटी शेळके, माजी आमदार सुधाकर कोहळे, गिरीश पांडव यांच्या भाग्याचा फैसला शनिवारी होणार आहे. शहरात सहा ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ग्रामीणमधील कामठी, काटोल, सावनेर, उमरेड, रामटेक आणि हिंगणा या सहा मतदारसंघाची मतमोजणी ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख, विद्यमान आमदार आशिष जयस्वाल, समीर मेघे, माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अपक्ष म्हणून लढणारे राजेंद्र मुळक, विशाल बरबटे, चरण सिंग ठाकूर, अनुजा सुनील केदार, माजी आमदार डॉ आशिष देशमुख, सुधीर पारवे, सुरेश भोयर,संजय मेश्राम यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.