पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सध्या प्रारंभीच्या टप्प्यात आहे. . आजपासून (दि. २२)राज्यात उमदेवार अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची असली तरी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुग्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना संदेश देण्यासाठी ही पोस्टर्स लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपने रविवार, 20 ऑक्टोबरला ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादी जाहीर होताच अनेक जागांवर तिकिटांचे वाद चव्हाट्यावर आले. आता मुंबईतील अंधेरीसह अनेक भागात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे छायाचित्र असल्याचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत. यामध्ये 'बटेंगे तो कटेंगे'.... असे लिहिले आहे. हे पोस्टर भाजपचे नेते विश्वबंधू राय यांनी लावले आहे.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 'बाटेंगे तो काटेंगे'चा नारा दिला होता. आता आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री योगींचा 'बाटेंगे तो काटेंगे'चा नारा ऐकू येईल का?, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होवू लागली आहे. बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मुख्यमंत्री योगी यांनी आग्रा येथे 'बाटेंगे तो काटेंगे'चा नारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या एका जाहीर सभेत या घोषणेचा उल्लेख केला होता.
आग्रा येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, 'बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे? आपण सर्वांनी पाहिले आहे की, अशा परिस्थितीत आपल्याला एकजूट राहण्याची गरज आहे. 'तुमच्यात फूट पडली तर तुम्हाला तोडले जाईल, तुम्ही एकजूट राहाल तर भक्कम राहाल.सध्या सर्वात मोठे आव्हान सनातन धर्मासमोर आहे. भारताचे आव्हान हे सनातन धर्माचेही आव्हान असल्याचेही त्यांनी म्हटलं होते.