Maharashtra Assembly Election
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे

Thane Election |मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे ही ठाण्यातील सर्वात लक्षवेधी लढत

कोपरी पाचपाखाडीत 'विकास' विरुद्ध 'निष्ठे'चा मुद्दा अजेंड्यावर
Published on

ठाण्यात सर्वात लक्षवेधी असलेली लढत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजे दिघंचे वारसदार केदार दिघे यांच्यामध्ये होणारी लढत आहे. लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला येथे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा ६६ हजार एवढी मते अधिक मिळाली आहेत. आता हे मताधिक्य १ लाखावर नेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.

दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपले आव्हान अधिक तगडे करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा ट्रेंड येथेही पाहायला मिळेल. शशी सावंत, मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ पारंपरिक मतदार संघ आहे.

या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी तीन वेळा विजय मिळवून हॅ‌ट्ट्रिक साधली आहे. आता चौथ्यांदा ते या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. २००९ पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. २००४ ला सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता; मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी हा आहे. मागच्या विधानसभेला म्हणजेच २०१९ ला त्यांच्या विर- ोधात संजय घाडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

यावेळी ८९ हजारांचे मताधिक्य शिंदेंना मिळाले होते. आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्यात एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्य चेहरा म्हणून समोर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला वेगळी धार आली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाण्याची ही लढत आणखीनच महत्त्वाची ठरत आहे. अलीकडेच धर्मवीर-२ या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. यातून आनंद दिघे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असताना दिघे विरुद्ध शिंदे सामना हा आणखीनच चर्चेचा विषय झाला आहे. ठाण्यामधील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात प्रामुख्याने शहरी तोंडावळ्याचे मतदार अधिक आहेत.

दुरंगी लढतीचेच चित्र

संपूर्ण राज्यात लक्षवेधी मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ पाहिला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मनसेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. यापुढेही तो जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनसेचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना असेल, हे जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना रिंगणात उतरवून ही लढत अधिक रंगतदार करण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या तरी या मतदारसंघात दुरंगी लढतीचेच चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात एकूण ३ लाख ३८ हजार १२० मतदार आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या १ लाख ५८ हजार एवढी आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही राज्यात लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणी किती साथ देणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

  • लोकसभेला या मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यापेक्षा शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना ६६ हजार मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी विरोधकांकडून बोगस मतदारांचा * मुद्दा उपस्थित केला होता; मात्र या तक्रारीवर निवडणूक आयोगाने कानावर हात ठेवले होते. हे सर्व मुद्दे आता पुन्हा एकदा नव्याने विरोधकांनी चर्चेत आणले आहेत.

  • ठाकरे गटासाठी ही लढत अधिक कठीण असली तरी ही लढत एकतर्फी होऊ द्यायची नाही यासाठी महविकास आघाडीच्या घटक पक्षांना बरोबर घेऊन काम करण्याचा • निर्णय घेतला आहे; मात्र मनसैनिकांचा अप्रत्यक्ष पाठिंबा मुख्यमंत्र्यांना या मतदारसंघात मिळणार असल्याने त्यांचेही अप्रत्यक्ष बळ वाढत आहे.

  • ज्या मतदार संघात एकनाथ शिंदेंनी राजकारणाचा श्रीगणेशा केला; ते होम ग्राऊंड पाचपाखाडी आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना दोघांसाठीही महत्त्वाचा असला तरी मुख्यमंत्र्यांसाठी तो अधिक लक्षवेधी आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे होम ग्राऊंडवर ठाकरेंना कशी मात देतात, हे पाहणे सर्वांनाच उत्सुकतेचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news