ठाणे : राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी गरुपृष्यामृतच्या मुहुर्तावर गुरुवार (दि.24) रोजी 723 उमेदवारांनी नामनिर्दशन अर्ज दाखल केले. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघासाठी 17 उमेदवारांच्या 37 अर्जांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार रुपेश म्हात्रे, सुलभा गणपत गायकवाड, नजीब मुल्ला आणि अविनाश जाधव या प्रमुख उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले.
रखरखत्या उन्हात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघड्या जीपवर उभे राहून मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांच्याकरिता शक्तिप्रदर्शन केले तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुलभा गायकवाड यांच्याकरिता रॅली काढली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्यासोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघांपैकी ओवळा - माजिवडा, ऐरोली, बेलापूर, भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदार संघांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सर्वाधिक 6 अर्ज हे मुंब्रा कळवा मतदार संघात दाखल झाले असून त्यामध्ये चार अर्ज हे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे आहेत. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे हे हजर होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या ठाणे विधानसभेत मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तर शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशन दाखल केले. यावेळी नाराज काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यावर बहिष्कार टाकला. त्याचीच चर्चा दिवसभर होती. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. त्याचवेळी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केला. गोळीबारामुळे प्रकाशझोतात आलेल्या कल्याण पूर्व मतदार संघातून आमदार गणपती गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी देऊन शिंवसेना शिंदे गटाचा विरोध मोडीत काढला. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः जाऊन गायकवाड यांचा अर्ज दाखल केला आहे.
मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी पाचव्यांदा जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची विशेष हजेरी होती. शेजारील शहापूर मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भिवंडी पूर्व मतदार संघाचा वाद अद्याप सुटला नसताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर भिवंडी ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांच्या विरोधात भाजपच्या नेत्या स्नेहा पाटील आणि मनीषा ठाकरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे भिवंडी ग्रामीणमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसून येते. एकंदरीत ठाणे विधानसभा 5, मुंब्रा - कळवा सहा, कोपरी पाचपाखाडी 2, डोंबिवली 1, कल्याण पूर्व 3, कल्याण ग्रामीण 2, कल्याण पश्चिम 1, मुरबाड 4, शहापूर 3, उल्हासनगर 2, अंबरनाथ 2, भिवंडी ग्रामीण दोन, भिवंडी पूर्व 1 आणि मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.