.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
महाराष्ट्रातील 14 व्या विधान सभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कल्याण-डोंबिवली शहर व ग्रामीण विभागातील चारही विधान सभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकाची भाऊगर्दी वाढली आहे.
सर्वच पक्षातील इच्छुकांनी गुडघ्याला बांशिंग बांधत आपणच उमेदवार असल्याचा डंका पिटण्यास सुरुवात केली असली तरी मनात मात्र धाकधूक वाढली आहे. महायुती आणि महाआघाडीच्या मित्रपक्षांमध्ये मतदार संघ मिळविण्यासाठी चुरस निर्माण केलेली असताना दुसरीकडे उमेदवाराची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वच राजकीय पक्षांना विधानभवन खुणावू लागले आहे.
कल्याण पश्चिम मतदार संघ हा सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, भाजपाकडून वरुण पाटील, नरेंद्र पवार यांनी या मतदार संघावर दावा केला आहे. तर महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे विजय (बंड्या) साळवी, सचिन बासरे, साईनाथ तारे, काँग्रेसकडून कांचन कुलकर्णी, राकेश मुथा, राजाभाऊ पातकर, मनसेकडून माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक उल्हास भोईर,कस्तुरी देसाई यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कल्याण पूर्वेतून भाजपा सेना युतीतील वितुष्ट जगजाहीर असून विद्यमान भाजपाचे आमदार गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने त्याच्या जागी त्याची पत्नी सुलभा गायकवाड याना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हर्षवर्धन पलांडे, रमेश जाधव आणि धनंजय बोडारे यांच्यात स्पर्धा आहे. तर काँग्रेसचे सचिन पोटे, नवीन सिंग हे देखील उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
डोंबिवली विधानसभा मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे सर्वश्रुत आहेच. गेली 34 वर्षे तत्कालीन कल्याण विधानसभा आणि आताचा डोंबिवली विधानसभेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. मागील तीन निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे आमदार मंत्री रविंद्र चव्हाण यंदा चौथ्यादा निवडणुकीत चौकार मारण्याच्या तयारीत असताना बदल घडविण्याचा दावा करत शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या दिपेश म्हात्रे यांनी कडवी लढत देण्याची तयारी चालवली आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघावर मनसेचे प्राबल्य असून मागील तीनपैकी दोन निवडणुका मनसेने जिंकल्या आहेत. मनसेकडून या निवडणुकीत आमदार राजू पाटील आणि त्यांचा भाऊ विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेच्या विभाजनात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवाराची रांग लागली आहे. शिंदे गटाकडून राजेश मोरे, रमाकांत मढवी, महेश पाटील तर ठाकरे गटाकडून तत्कालीन आमदार सुभाष भोईर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीमधील चारही मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादीकडून दावाच करण्यात आलेला नसल्याने मित्रपक्षासाठी राष्ट्रवादीच्या मताची बेगमी सोबत राहणार आहे. यामुळे यातील कोणाला लॉटरी लागणार आणि प्रत्यक्षात लढत किती ताकदीची होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीची बिगुल वाजल्याने निवडणुकीला सामोरे जाण्यास इच्युकांच्या दावेदारीसाठी पक्षश्रेष्ठी कडे मनधरणीला सुरुवात झाली असून आपल्याच पक्षाला विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी, या करीता कार्यकर्त्याची मागणी वाढल्याने युती आघाडीच्या पक्ष श्रेष्ठीच्या जागावाटपा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे .