बारामती : आईने सांगूनही समोरून अर्ज दाखल केला गेला. मी केलेली चूक त्यांनीही केली या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टिकेला त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी उत्तर दिले. माझी आई असे म्हणालीच नाही असे म्हणत त्यांनी अजित पवार यांचे म्हणणे खोडून काढले.
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्याच सभेत अजित पवारांनी भावनिक साद घातल्याचे दिसून आले. पवार आपल्या भाषणात म्हणाले की, आईने सांगितले होते माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कोणी भरायला सांगितला असे विचारले तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला. म्हणजे साहेबांनी तात्या साहेबांचे कुटुंब फोडले का? असा सवाल केला होता.
त्यावर श्रीनिवास पवार म्हणाले की, मी सभा ऐकली नाही. माझी माहिती अशी आहे की, आईने असे काही भाष्य केले नाही. दादा हे का बोलले हे त्यांचे त्यांनाच माहिती. साहेबांबाबत अजिबात चर्चा झाली नाही. आईला दादा जसा आहे तसाच युगेंद्र ही नातू म्हणून आहे. त्याच्यामुळे दोघेही तिला सारखेच आहेत. आणि ती राजकारणावर भाष्य करत नाही. त्यामुळे मला वाटत नाही की, आई अशी म्हटली असेल.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊ नको असे सांगितले होते. सुप्रिया आपली लहान बहीण आहे. ती आपल्या अंगा, खांद्यावर खेळली आहे. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे असे मी अजित दादांना सांगत होतो. मात्र अजित दादा माझं ठरलं यावर ठाम होते असे श्रीनिवास पवार म्हणाले.