नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध साकोली मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार अखेर ठरला. भाजपमधील सर्व इच्छुकांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून २४ तासांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत भाजपच्या दोन याद्यांमध्ये १२२ उमेदवार जाहीर करण्यात आले, आज (सोमवारी) भाजपची तिसरी यादी जाहीर झाली, यामध्ये २५ उमेदवार जाहीर करण्यात आले.
भाजपच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये साकोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार कोण ?, अशा चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत होत्या. अखेर भाजपने यावर निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव तथा जि. प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या यादीत याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.