नांदेड : भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर पक्षाच्या उमेदवारीसाठी त्यांनी उमरी तालुक्यातील मारोतराव कवळे यांचे नाव पुढे केले आहे. दुसऱ्या बाजूला माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांचेही प्रयत्न जारी असून त्यांच्या उमेदवारीसाठी माजी खासदार प्रताप चिखलीकर यांनी 'ना हरकत' दिली असल्याचे सांगण्यात आले. (maharashtra assembly poll)
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीसह मुंबईतही वेगवेगळ्या घडामोडी सुरू असताना भाजपाच्या नेत्यांसमोर नांदेडमध्ये लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्याचा विषय प्रलंबित आहे. शनिवारी त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. माजी खासदार चिखलीकर यांच्यासह भाजपातील लोकसभा आणि विधानसभेच्या काही इच्छुकांची मुंबईमध्ये धावपळ चालली आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी, असे भाजपातील काही नेत्यांचे म्हणणे होते. पण आपण निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पक्षातील चार इच्छुकांमधून त्यांनी भाजपात नव्यानेच आलेल्या कवळे यांचे नाव पक्षनेत्यांना सुचविले आहे. चव्हाण आणि कवळे यांच्यात साखर कारखानदारीमुळे जवळचे संबंध आहेत. चव्हाण यांच्याशी संबंधित साखर उद्योग समुहातला वाघलवाडा येथील कारखाना कवळे यांनी तीन वर्षांपूर्वी विकत घेतला होता. तेव्हापासून दोघांमधील संबंध सुमधूर झालेले आहेत. कवळे यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून देणे शक्य नसल्यामुळे चव्हाण यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नाव पुढे केले आहे. (maharashtra assembly poll)
माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनीही लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून भाजपातील प्रमुख नेत्यांसह संघ परिवाराचीही त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. रातोळीकर यांना उमेदवारी देऊन पक्षसंघटनेतल्या कार्यकर्त्यास संधी दिली जावी, असे प्रदेश भाजपातील काही पदाधिका-यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समवेत झालेल्या चर्चेमध्ये रातोळीकर यांना उमेदवारी दिल्यास आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केले. लोकसभेच्या उमेदवारीवरून अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यात एकमत नसल्याचेही दिसत आहे. यांच्या उमेदवारीचा भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांनाही लाभ मिळू शकतो, या विचारातून त्यांचे नाव पुढे करण्यात आले असावे, असे मानले जात आहे. रातोळीकर यांच्याशी संपर्क साधला असता पक्षातील आपली एकंदर कारकीर्द, आपण केलेले काम या सर्व बाबींचा विचार करून पक्षश्रेष्ठी आपल्या नावाचा विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
भाजपामध्ये नांदेडसंबंधी वेगवेगळ्या घडामोडी सुरू असतानाच देगलूर- बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी शनिवारी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. साबणे आपल्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असून त्यासाठी त्यांनी आ. बच्चू कडू यांच्या माध्यमातून तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला. या आघाडीतर्फेच निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले.