Nashik Politics | घराणेशाही उदंड झाली ! अर्धा डझन दिग्गजांचे वारसदार निवडणूक रिंगणात

Maharashtra Assembly Polls |
Maharashtra Assembly Polls
घराणेशाहीfile
Published on
Updated on

नाशिक : राजकारण आणि घराणेशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ही परंपरा दशकानुदशके अव्याहत सुरू राहिल्याने यंदाची निवडणूक त्यास अपवाद ठरण्याचे कारण नाही. घराणेशाहीबरोबर जनतेची असलेली बांधिलकी उमेदवाराला फलदायी ठरते, हे प्रमेय लक्षात घेऊन राजकीय पक्ष अशा चेहऱ्यांना मैदानात उतरवत असतात. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उमेदवारी घोषित झालेल्या नावांवर दृष्टिक्षेप टाकल्यास वस्तुस्थिती अधोरेखित होते.

१. अद्वय हिरे : मालेगाव बाह्य मतदारसंघात उद्धवसेनेचेे उमेदवार असलेले अद्वय हिरे यांच्या घराण्याला मोठी परंपरा आहे. पणजोबा भाऊसाहेब हिरे, आजोबा व्यंकटराव हिरे, आजी पुष्पाताई हिरे, वडील प्रशांत हिरे यांना राज्य मंत्रिमंडळात मानाचे पान लाभल्यानंतर बंधू अपूर्व हिरे यांनीही विधान परिषदेची टर्म पूर्ण केली आहे.

२. नितीन पवार : आदिवासीबहुल कळवण - पेठ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिलेदार म्हणून पवार मैदानात आहेत. वडील दिवंंगत ए. टी. पवार यांनी सलग आठ वेळा आमदारकीचा टिळा लेवत मंत्रिपदही गाजवले. पाणीदार नेतृत्व म्हणून ख्याती असलेल्या ए. टी. पवार यांच्या लोकाभिमुखतेची आजही चर्चा होते.

३. प्रा. देवयानी फरांदे : ज्येष्ठ भाजप नेते दिवंगत नारायण फरांदे यांच्या देवयानी फरांदे या चुलतस्नुषा. नाशिक मध्य मतदारसंघातून त्या भाजपकडून तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. नारायण फरांदे यांनी विधान परिषद नाशिक पदवीधर मतदारसंघाचे तब्बल तीनदा प्रतिनिधित्व केले. उत्तम वक्तृत्वशैलीच्या फरांदे यांच्या विधिमंडळातील अभ्यासू भाषणांचे आजही दाखले दिले जातात.

४. डॉ. राहुल आहेर : चांदवड - देवळा मतदारसंघात हॅट्ट्रिकसाठी भाजपकडून लढत देत असलेले डॉ. राहुल आहेर हे दिवंगत मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे सुपुुत्र. नाशिकमधून तीनदा आमदारकी आणि एकदा खासदारकी मिळवलेल्या डॉ. दौलतराव आहेर यांची शिवसेना - भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशकात आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

५. सीमा हिरे : नाशिक पश्चिममधून भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेल्या सीमा हिरे ह्या ज्येष्ठ भाजप नेते दिवंगत पोपटराव हिरे यांच्या स्नुषा आहेत. रा.स्व. संघाशी पाच दशकांची बांधिलकी असलेल्या हिरे घराण्याचा भाजपने नेहमीच आदर केला. पोपटराव हिरे यांंनी १९८४ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यामध्ये पराभूत होऊनही त्यांनी दिलेली लढत लक्षवेधी ठरली.

६. ॲड. राहुल ढिकले : नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपकडून दुसऱ्यांदा लढणारे ॲड. राहुल ढिकले हे दिवंगत नेते उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र आहेत. सहकार आणि राजकीय क्षेत्रांतील चाणक्य म्हणून ढिकले यांच्या नावाचा आजही उल्लेख होतो. नाशिकचे महापौर, खासदार तसेच प्रथमच विभाजित नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदारपद त्यांनी भूषवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news