कराड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कार्यकाळातील एकही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना रिटायर करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याचेही ते म्हणाले. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित डॉक्टर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. सुरेश भोसले, डॉ. सारिका गावडे, रोहिणी शिंदे उपस्थित होत्या.
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांचा 15 वर्षांचा कार्यकाल वगळता सहा दशके काँग्रेसचे देशात सरकार सत्तेवर होते. राज्यातही 1995 चा अपवाद वगळता 2014 पर्यंत अशीच परिस्थिती होती. मात्र असे असले तरी 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच देशाचा खर्या अर्थाने विकास झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून काँग्रेस गरिबी हटाव असा नारा देत असून आजही काँग्रेसकडून हाच नारा दिला जात आहे. भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्यांच्या हाती काहीच पडत नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मोफत धान्य, जनधन योजना, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन यासह अन्य विविध लोकहितवादी योजनांच्या माध्यमातून गरिबी हटवित महिला सक्षमीकरण, उद्योग व रोजगार निर्मितीला चालना दिली आहे.
आयुष्यमान भारत यासारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले आहेत. जगात आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचवली असून येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात दुसर्या नंबरवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. अतुल भोसले यांच्यासह भोसले कुटुंबाने कोरोना काळात गोरगरिबांना कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून आधार दिला. आमदार नसतानासुद्धा अतुलबाबा भोसले यांनी 750 कोटींची विकासकामे केली आहेत, असेही ते म्हणाले.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेला जनतेने बहुमत दिले होते; मात्र उद्धव ठाकरे यांनी मुलासाठी युती तोडत विरोधकांशी हातमिळवणी केली. हिंदुत्व व विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दाखवलेला विश्वास तोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र धाडसाने पुन्हा युती सरकार सत्तेवर बसविले. त्यानंतर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सुरू असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.