जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मंगळवार (२९) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी दिसून आली. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवार व समर्थकांची गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. जालना विधानसभा मतदारसंघात मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीचे उमेदवार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खोतकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
भोकरदन विधानसभेसाठी शेवटच्या दिवशी ४२ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. आजपर्यंत ६२ उमेदवारांचे ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संतोष पाटील दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी सभापती एल. के. दळवी, शिव- सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मनीष श्रीवास्तव यांच्यासह ४२ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. परतुर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी २३ उमेदवारांनी ३३ तर आजपर्यंत ३६ उमेदवारांनी ६१ अर्ज दाखल केले आहेत.