

लातूर : लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्यावतीने लढण्यास मी इच्छुक होतो. त्या दृष्टीने पूर्वतयारी केली होती. परंतु, पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला पसंती दिली. यामुळे माझ्यासह हजारो कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तरीही पक्षाच्या विचारधारेशी बेईमानी करणे माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे बंडखोरी करून निवडणूक लढविणार नाही, अशी भावना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.
लातूर शहरमधून निवडणुक लढण्याची कव्हेकर यांनी तयारी केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. यानंतर कव्हेकर यांनी आपल्या निवासस्थानी कार्यकत्यांची बैठक घेतली. माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर बाबासाहेब देशमुख, विश्वजीत पाटील कव्हेकर, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कव्हेकर म्हणाले की, २०१९ मध्ये मागुनही उमेदवारी मिळाली नाही. नगरसेवक असताना कुठल्याही समितीचा सभापती सोडा साधा सदस्य म्हणूनही मला संधी मिळाली नाही. युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असताना हजारो युवकांना पक्षाशी जोडले. विरोधकांना अंगावर घेतले. तरीही आपल्याला डावलण्यात आले तथापि. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्ष नेतृत्वाने निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी मी काम करत राहणार आहे.
तसेच पक्षश्रेष्ठी आपल्या भावना समजून घेणार नाहीत तोपर्यंत आपण प्रचार कार्यात सहभागी होणार नसल्याचेही अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले.