

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघासाठी तब्बल 281 उमेदवारांनी आपले नामनिर्दशन पत्रे दाखल केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. सर्वात जास्त 24 उमेदवारी अर्ज हे भिवंडी पूर्व मतदारसंघात असून मुरबाडमध्ये पाच उमेदवार असल्याचे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, संजय केळकर, मंदा म्हात्रे, गीता जैन, बालाजी किणीकर, राजू पाटील आणि सुलभा गायकवाड यांच्या लढतीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक यांच्याविरोधात शिवसेना नेते विजय चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केल आहे. उबाठा गटाचे मनोहर मढवी यांना रिंगणात उतरविल्यामुळे ऐरोलीत तिरंगी लढत पाहायला मिळेल. त्यांच्या शेजारी असलेल्या बेलापूर मतदार संघात ही शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांनी भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार संदीप नाईक यांना उमेदवारी दिल्याने लढत चुरशीची होणार आहे. त्यात मनसेने पुन्हा गजानन काळे यांना निवडणूक रिंगणात उतरविले असल्याने या लढतीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
ठाणे विधानसभा मतदार संघात थेट तिरंगी लढत होत असून भाजपचे संजय केळकर, शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांच्या रूपाने दिघेंअस्त्र वापरत शिवसेना उबाठा गटाने थोडीशी रंगत आणली आहे. तर कोपरी पाचपाखाडी मतदार संघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि उबाठा गटाचे नरेश मणेरा यांच्यात थेट लढत पाहायला मिळेल.
मुंब्रा-कळवा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीने अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांना रिंगणात उतरवून रंगत आणली आहे. तर मनसेने सुशांत सूर्यराव यांना उमेदवारी दिली आहे. डोंबिवली विधानसभा मतदार संघात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी पक्षांतर करीत उबाठा गटातर्फे उमेदवारी मिळविली.कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने राजेश मोरे आणि उबाठा गटाने सुभाष भोईर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
कल्याण पूर्व मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे प्रमुख महेश गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरला असून काँग्रेसचे सचिन पोटे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून काँग्रेसच्या नेतृत्वाचा निषेध केला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात एकही जागा काँग्रेसला सोडण्यात आलेली नाही. उबाठा गटाने धनंजय बोडारे यांना पुन्हा संधी दिल्याने कल्याण पूर्वेत तिरंगी लढत पाहायला मिळेल.
कल्याण पश्चिम मतदार संघात बंडखोरीची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पुन्हा अपक्ष अर्ज दाखल करून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना आव्हान दिले आहे. कल्याणात उबाठा गटातर्फे सचिन बासरे आणि मनसेने उल्हास भोईर यांना मैदानात उतरवल्याने चौरंगी लढत पाहायला मिळेल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनीं शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांना पक्षाने उमेदवारी दिली असून उबाठा गटाने राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. मुरबाड मतदार संघात आमदार किसन कथोरे यांना पाचव्यांदा उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाने सुभाष पवार यांना शिंदे गटातून आयत करीत उमेदवारी दिली. शहापूर मतदार संघात पारंपरिक पांडुरंग बरोरा आणि दौलत दरोडा यांच्यात लढत होणार असली तरी जिजाऊ संस्थांच्या उमेदवारामुळे लढत तिरंगी बनली आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शांताराम मोरे याना तिसर्यांदा उमेदवारी मिळाली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. उबाठा महादेव घाटळ आणि जिजाउं संस्थेने उमेदवार दिल्याने लढत चौरंगी होऊ शकते. शेजारील भिवंडी पूर्व विधानसभेत समाजवादी पार्टीचे रईस शेख यांच्या विरोधात उबाठा गटाच्या रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केलेली आहे. तर भाजपचे संतोष शेट्टी यांनी पक्षांतर करीत शिवसेनकडून उमेदवारी मिळविली. मनसेनेही मनोज गुलवी यांना तिकीट दिली आहे. सर्वाधिक 24 उमेदवार या मतदार संघात असले तरी तिरंगी लढत अपेक्षित आहे. भिवंडी पश्चिम मतदार संघात भाजपचे महेश चौघुले यांच्याविरोधात काँग्रेसने दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिल्याने लढत चुरशीची होणार आहे. 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून एमआयएमच्या उमेदवारामुळे लढत रंगतदार होईल.