नवाब मलिकांना तिकीट द्यायला नको होते- आशिष शेलार
नवाब मलिकांना तिकीट द्यायला नको होते- आशिष शेलार
अखेरच्या क्षणी नवाब मलिक यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर बोलताना, मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार म्हणाले, "अजित पवार यांनी त्यांना तिकीट द्यायला नको होते. महाराष्ट्रातील अनेक लोकांनाही तसेच वाटते. त्यांच्यावर ज्या प्रकारचे गंभीर आरोप आणि आरोपपत्र आहेत; ते पाहाता त्यांना महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. महाराष्ट्र दाऊदसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात आहे. भाजप त्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही.''
जयश्री जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
ऐन निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
माहीममध्ये भाजपचा राज ठाकरेंना पाठिंबा ?
माहिममध्ये भाजप मनसेला पाठिंबा देणार का, यावर फडणवीस म्हणाले की, "आम्ही माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच काहीतरी तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा आहे. राज ठाकरेंना उत्तर भारतीय लोकांचा विरोध आहे. मात्र राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारल्याचे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट झाले होते."
रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेस नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
६ नोव्हेंबरपासून आघाडीच्या प्रचाराला सुरुवात
10-12 जागांवर आघाडीतच दोन उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत आम्ही एकत्र बसून त्यावर तोडगा काढू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आम्ही जाहीरनामा आणि आमची विचारधारा घेऊन लोकांमध्ये जाऊ जेणेकरून आम्हाला पाठिंबा आणि मदत मिळेल. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि माझ्या उपस्थितीत ६ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहोत. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनता आम्हाला भरभरून पाठिंबा देईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंना मुलाच्या भविष्याबद्दल भीती : राऊत
'या निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री असेल' या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणतात, "त्यांचा मुलगा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांची मानसिक स्थिती समजेल. या नेत्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात येऊ दिले नाही. पण आता त्यांनी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या मनात भीती आहे, ती त्यांच्या मुलाच्या भविष्याबद्दल असेल. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल आणि हे राज ठाकरे चांगलेच जाणतात."
उद्धव ठाकरेंची पहिली सभा रत्नागिरीत होणार
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाच नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार असून, त्यांची पहिली सभा रत्नागिरी येथे होणार आहे. लोकसभेला कोकणातील दोन्ही मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांची सांगता सभा होणार आहे. ठाण्यातही १६ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सभा घेतील. या निवडणुकीत त्यांच्या २० ते २५ जाहीर सभा होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रात दहा ते पंधरा सभा होणार
विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे दिग्गज नेते निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दहा ते पंधरा सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याखेरीज भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, त्यात केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची ३० ऑक्टोबर रोजी छाननी केली झाली. २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.