पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची निवडणूक आयोग (Election Commission on EVM ) आज (दि.१५) घोषणा करणार आहे. तत्पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ईव्हीएमबाबत विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी ईव्हीएम १०० टक्के निर्दोष असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएममध्ये फेरफार होण्याचा आरोप केला आहे. यावर राजीव कुमार यांनी (Election Commission on EVM ) आज उत्तर दिले आहे. ते 'एएनआय'शी बोलताना म्हणाले की, मतदानात सहभागी घेऊन लोक प्रश्नांची उत्तरे देतात. ईव्हीएमबाबत प्रश्न आहे, तर ते 100 टक्के निर्दोष आहे. जर विरोधकांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले, तर आम्ही त्यांना पुन्हा उत्तर देऊ.
यापूर्वी, काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी दावा केला होता की, इस्रायलने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे पेजर हॅक केल्याचे उदाहरण देऊन ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधकांनी ईव्हीएमवर नव्हे, तर कागदी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा आग्रह धरायला हवा. अन्यथा महाराष्ट्रात भाजप सरकार आणि निवडणूक आयोग काहीही करू शकते. पेजर आणि वॉकीटॉकी वापरून इस्रायल लोकांचा जीव घेऊ शकत असेल, तर ईव्हीएममध्येही फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईव्हीएमसोबत मोठा खेळ होऊ शकतो. भाजप निवडणुकीआधीच हा खेळ करू शकते, असा आरोपही अल्वी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला एक निवेदन सादर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हरियाणातील 20 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेतील गंभीर आणि स्पष्ट अनियमितता अधोरेखित झालेली आहे. आम्ही आशा करतो की, निवडणूक आयोग याची दखल घेईल आणि योग्य निर्देश जारी करेल.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला (Election Commission on EVM) 20 जागांची यादी पाठवली होती. ज्यात उमेदवारांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मतमोजणीबाबत त्यांच्या लेखी आणि तोंडी तक्रारी सादर केल्या होत्या. मतमोजणीच्या दिवशी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.