समीर जाधव
चिपळूण : परतीच्या पावसाचा गडगडाट सुरू असतानाच उत्तर रत्नागिरीतही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार गडगडाट झाला. काका-पुतण्यांच्या या गडगडाटाने जिल्हाच काय, तर कोकणात विजा चमकल्या. त्यामुळे आता पुढच्या काळात कोणती राजकीय गणिते समोर येतात, हे औत्सुक्याचे राहणार आहे. विशेष म्हणजे हा गडगडाट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये असल्याने त्याची झळ महायुतीला की महाविकास आघाडीला बसते, हे आगामी निवडणूक स्पष्ट करणारी आहे.
चिपळूणमध्ये काका-पुतण्यांची जोरदार जंगी सभा झाली. आधी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रॅली आणि सभेच्या माध्यमातून राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूण परिसरातील तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, विविध संघटना यांच्या गाठीभेटी घेतल्या. मुस्लीम समाजालादेखील वेळ दिला आणि त्यांनी ही सभादेखील गाजवली. विशेष म्हणजे या सभेत आ. शेखर निकम यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता तोफ डागली. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी तर थेट इशाराच दिला. निवडणूक पूर्वीचे हे इशारे जोरदार चर्चिले जात असून, त्यातून या सभेत निवडणुकीचे ढग जमा झाल्याचे पाहायला मिळाले. ही सभा आ. शेखर निकम यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. आ. शेखर निकम यांनीदेखील या सभेच्या निमित्ताने समोर येणाऱ्या विरोधकांना जोरदार इशारे दिले, त्यामुळे आगामी काळात त्याचे कसे पडसाद उमटणार, याची दिशा आता स्पष्ट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांनंतर चिपळूणमध्ये मुक्काम ठोकला. या मुक्कामात नेमके काय काय घडले, हे आगामी निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. उपमुख्यमंत्री सावर्डेमध्ये वास्तव्याला होते. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर होती. आ. शेखर निकम यांच्यासहीत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आडाखे बांधले आहेत, त्यामुळे दादांचा दौरा महत्त्वाचा ठरला आहे. सत्ताधारी पक्षात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये आहेत. केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विरोधकांना हा एक प्रकारचा इशाराच समजायचा का? अशा प्रकारे ही सभा झाली आहे. सभेनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला अवघ्या एका दिवसाच्या अंतराने चक्क काकाच चिपळूणमध्ये अवतरले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खा. शरद पवार यांनी थेट सातारहन चिपळुणात तळ ठोकला. हेलिकॉप्टरचा प्रवास नाकारून त्यांनी रस्ते मागनि येणे पसंत केले. सत्ताधारी महायुतीकडून विकास होतोय का? रस्ते कसे आहेत ? लोकांच्या समस्या काय? हे बघण्यासाठी ते कराड मार्गे चिपळुणात आले आणि पाटण कराडचा रस्ता बघून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग व सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. तीनवेळा रस्ते करूनदेखील रस्ता खड्डेमय कसा? असा जाब विचारून जाहीर भाषणात सरकारचे कान टोचले. पाटण रस्त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्री लक्ष देतील का? हा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. अनेकदा चिपळुणातील नागरिक या रस्त्याबाबत ओरड करतात; मात्र सातारा जिल्ह्यात असलेला हा रस्ता दुर्लक्षित राहिल्याचे आता अधोरेखित झाले आहे.
खा. शरद पवार यांची चिपळुणातील सभा विराट झाली. खा. पवार येणार म्हणून रत्नागिरी जिल्हाच काय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोक या सभेला हजर होते. कारण अनेक वर्षांनंतर शरद पवार यांची चिपळुणात जाहीर सभा होत होती. या सभेत पवार यांनी भ्रष्टाचारावर बोट ठेवले. राजकोटचा कोसळलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि सरकारचे दुर्लक्ष याची गंभीर दखल घेत थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, असा इशारा यावेळी दिला. ही सभा महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेले प्रशांत यादव यांच्यासाठी होती. प्रशांत यादव यांनी आपल्या कार्याचा आढावा घेतला; मात्र माजी आ. रमेश कदम यांनी आ. शेखर निकम यांच्यावर टीकेची झोड उठवली. याचे पडसाद आगामी काळात कसे उमटतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांनीदेखील चिपळूणमध्ये मुक्काम केला. त्यांचाही मुक्काम अनेक वर्षानंतरचा होता. ८४ वर्षांच्या या 'राजकीय युवकाने' ही सभादेखील गाजवली. यानंतर येथील महत्त्वाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यादेखील गाठीभेटी घेतल्या. मुस्लीम समाजालादेखील निधी देण्याचे आश्वासन दिले. हे दोन्ही दौरे लक्षात घेतल्यास आगामी काळातील राजकीय चित्र स्पष्ट करणारे आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटप व्हायचे आहे. चिपळूणची जागा कोणाला मिळणार? हा प्रश्न आहे. श्री. पवार यांनी चिपळूणमध्ये येऊन उमेदवाराची घोषणा केली नसली तरी हा दौरा बरेच काही सांगून गेला आहे.
काका-पुतण्याच्या सभेमध्ये चिपळुणातील आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली. खरे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत आ. शेखर निकम यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता जो विरोधक येईल त्याला इशारे दिले. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनीदेखील कोणाचाही नामोल्लेख केला नाही; मात्र जोरदार इशारा दिला. प्रत्युत्तरादाखल खा. शरद पवार यांच्या सभेत माजी आ. रमेश कदम यांनी मात्र आ. शेखर निकम यांचा उल्लेख करीत टीकेची झोड उठविली. कोण स्थानिक ? कोण बाहेरून आलेले? असा मुद्दा या सभेत काढला. निकमांच्या संस्थेबाबत देखील उल्लेख केला, त्यामुळे भाईच्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.