मुंबई : पुढारी वृत्तसेवा
ठाकरे गटाचे वरळी मतदारसंघातील उमेदवार आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्यानुसार त्यांची एकूण संपत्ती २१ कोटी ४८ लाख रुपये असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे या प्रतिज्ञापत्रावरील तपशिलावरून दिसून येते.
यामध्ये रायगड येथे जमीन आणि मुंबईत २ गाळे त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्याकडे १ बीएमडब्ल्यू कार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. त्यांची किंमत बाजारमूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे.
तसेच रायगडमध्ये १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये किमतीची जमीन आहे. त्यांच्याकडे १ कोटी ९१ लाख ७ हजार १५९ रुपयांचे दागिने आहेत. त्यांची जंगम मालमत्ता १५ कोटी ४३ लाख ३ हजार ६० रुपयांची असून, अचल मालमत्ता - ६ कोटी ४ लाख ५१ हजार ३५० रुपयांची आहे.
आदित्य ठाकरे यांच्या बँक खात्यात २ कोटी ४४ लाख १८ हजार ९८५ रुपये आहेत, तर बँकेत २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ रुपये फिक्स डिपॉझिट स्वरूपात आहेत. शेअर मार्केटमध्ये त्यांनी ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १० कोटी १३ लाख ७८ हजार ५२ रुपये असून, ५० हजार रुपयांचे बॉण्ड्स आहेत. एकूण गुंतवणूक १० कोटी १४ लाख ९८ हजार ५२ रुपयांची असून, विमा पॉलिसी २१ लाख ५५ हजार ७४१ रुपयांची आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर १ गुन्हा दाखल असून याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही. लोअर परळच्या पुलावरील डिलाईल रोडला जाणारी मार्गिका खुली केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.