

नाशिक : विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार व दिव्यांग बांधवांकरिता निवडणूक आयाेगाने घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने नाशिक पश्चिम मतदारसंघातील ज्येष्ठ व दिव्यांगांनी केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांशी (बीएलओ) सोमवार (दि. २८)पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी शुभांगी भारदे यांनी केले आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 3,759 व दिव्यांग मतदारसंख्या 2,038 एवढी आहे. अशा मतदारांचे मतदारयादीत 85 वर्षांवरील वय नमूद आहे. तसेच जे मतदार दिव्यांग असून, अशा मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी प्रपत्र 12 'ड' फॉर्म केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत भरून देणे आवश्यक आहे. प्रपत्र 12 'ड' समवेत दिव्यांग मतदारांसाठी 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रपत्र 12 'ड' भरून देणे हा अतिरिक्त पर्याय आहे. संबंधित मतदाराला वैयक्तिकरित्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ज्या मतदाराला गृह मतदानाद्वारे (टपाली मतपत्रिका) मतदान करावयाचे असेल, त्यांच्याकडून प्रपत्र 12 'ड' तत्काळ आपल्या क्षेत्रातील नियुक्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नाशिक पश्चिम निवडणूक कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील. केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक हे निवडणूक आयोगाच्या www.electoralsearch.eci.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे भारदे यांनी सांगितले.