नगर : मेंदू विकार तरीही बदली अर्ज करेक्ट ! बनावट बदली अर्जाबाबत होणार खातरजमा

नगर : मेंदू विकार तरीही बदली अर्ज करेक्ट ! बनावट बदली अर्जाबाबत होणार खातरजमा
Published on
Updated on

नगर :  हवी तेथे बदली मिळविण्यासाठी संवर्ग एकला प्राधान्य असल्याने दिव्यांग, घटस्फोटीत, हृदयरोग असलेल्या शिक्षकांची अर्ज संख्या वाढल्याचे दिसते. दरम्यान, या यादीत काही शिक्षक नेत्यांसह उंच शिखर चढणार्‍या बनावट दिव्यांगाचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती चर्चेतून पुढे आली आहे. या संदर्भात तक्रारी आल्यास जिल्हा परिषद प्रशासन खातरजमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षक बदल्यांची प्रक्रिया म्हटले की, संवर्ग एक आणि दोन नेहमीच चर्चेचे विषय होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मागे 76 गुरुजींचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळल्याची घटना अजूनही प्रशासन विसरलेले नाहीत.

मूळतः दिव्यांग शिक्षक, मानसिक विकलांग मुलांचे पालक, कर्करोग बाधित, मेंदुचा आजार, कुमारिका , विधवा, 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक याशिवाय ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत, आदी घटकातील शिक्षकांना संवर्ग एकमध्ये बदलीसाठी प्राधान्य आहे.  नगर जिल्हा परिषदेतून संवर्ग एकसाठी 1469 शिक्षकांनी इच्छित बदलीत प्राधान्य मिळावे, याकरिता ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. संवर्ग एकमधील पात्र शिक्षकांना बदलीत प्राधान्य मिळालेच पाहिजे, मात्र कोणी चुकीच्या प्रमाणपत्रावर बदलीचा लाभ मिळवत असेल, तर ते इतर शिक्षकांवर अन्यायकारक असल्याने आता संवर्ग तीन आणि संवर्ग चारमधील शिक्षकांमधूनच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी एकदा प्रमाणपत्राची पडताळणी करावी, अशी मागणी पुढे येऊ पाहते आहे.

विशेष म्हणजे, काही शिक्षकांनी दिव्यांग म्हणून प्रमाणपत्र दिलेले आहे, मात्र काही दिवसांपूर्वीच ते शिक्षक उंच शिखर चढून गेल्याचे सर्वश्रुत आहेच. काही शिक्षक नेत्यांवर देखील हृदयविकार आणि मेंदूवर उपचार सुरू असल्याचे दिसते. यातील मेंदूवर उपचार सुरू असतानाही संबंधित शिक्षकांनी अचूक अर्ज भरलेले आहेत, हे विशेषच. काही शिक्षकांचे विकारग्रस्त पाल्य 18 वषार्ंच्या पुढील आहेत का, स्वच्छ अभियानावेळी गुरुजींनी दिलेली माहिती पडताळणार का, अशा अनेक बाबींकडे शिक्षक संघटनाच सीईओंचे लक्ष वेधू इच्छितात.
दि. 24 तारखेपर्यंत संबंधित शिक्षकांनी पसंतीच्या 30 शाळा ऑनलाईन निवडल्या आहेत. मात्र संवर्ग एकची एकदा पुनर्पडताळणी होऊनच जाऊ द्या, अशी मागणी आता शिक्षकांसह प्रहारमधूनही सुरू आहे.

दुर्दैवाने हा तर कायद्याचा गैरवापर : वांढेकर

वेगवेगळ्या दूर्धर व्याधिग्रस्त व दिव्यांग शिक्षकांना शासनाने बदलीतून सूट तसेच प्राधान्यक्रम दिलेला आहे. मात्र त्या संवर्गाचा लाभ घेताना नियमांचा, कायद्याचा गैरवापर करून काहींनी न्यायालयाचीही दिशाभूल करत प्रमाणपत्र मिळविल्याची अनेक शिक्षकांनी तोंडी तक्रार केलेली आहे. तसेच संबंधित शासन निर्णय हा अवघड क्षेत्रासाठी असतानाही या शिक्षकांना शेवटचा प्राधान्यक्रम दिलेला आहे. त्यांना रिक्त जागा दाखवण्यात येणार नाहीत, याउलट कुठलेही प्राधान्य नसलेल्या संवर्ग चारला रिक्त जागा दाखविण्यात येतील. हा अजब कारभार आहे, असे अ. म. प्रा. शिक्षक संघ कार्याध्यक्ष शरद वांढेकर यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

शिक्षण विभाग तपासणी करणार का?

सन 2018-19 मध्ये झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांची कोणतीच माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहितीही पुढे आली आहे. पारदर्शी शिक्षक बदलीत संवर्ग एकच्या यादीतील शस्त्रक्रिया केलेल्या शिक्षकांनी शस्त्रक्रियेच्या काळात घेतलेल्या अर्जित रजा, ऑनलाईन सादर केलेले मेडिकल बिल, दिव्यांगतेची नोंद टक्केवारीनुसार आहे की नाही, युआयडीही तपासणी तसेच घटस्फोटीतांची सेवापुस्तके तपासणीचे सीईओ धाडस दाखविणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

2018 नंतर ज्यांनी प्रमाणपत्र काढले, अशा संबंधित शिक्षकांच्या फक्त प्रमाणपत्रांचीच नव्हे तर खर्‍याअर्थाने सीईओंनी त्यांच्या दिव्यंगत्वाची तपासणी करावी. त्यामुळे खर्‍या दिव्यांगांवर अन्याय होणार आहे. सीईओंकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत.
                                            -संतोष सरोदे, सहकोषाध्यक्ष; दिव्यांग संघटना

शिक्षक बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे. यात संवर्ग एकमध्ये बदलीत प्राधान्य घेणार्‍या शिक्षकांसंदर्भात कोणाची काही तक्रार आल्यास त्याची निश्चित चौकशी केली जाईल. चौकशीत प्रमाणपत्र किंवा अन्य पुरावे तपासले जातील.
                                            – भास्कर पाटील ,शिक्षणाधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news