काळजी घ्या ! अकोल्यात स्वाइन फ्लूचे दोन बळी !

एका रुग्णावर उपचार सुरू; डेंग्यू, चिकन गुनियाचेही थैमान

Two victims of swine flu in Akola
स्वाइन फ्लूचे दोन बळी
Published on
Updated on

नुसते नाव घेताच अंगाचा थरकाप उडविणार्‍या स्वाईन फ्लू आजाराने तालुक्यातील गणोरे व पाडाळणे येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजुर येथील एका स्वाईन फ्लू रुग्णावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुक्यामध्ये डेंग्यूचे 7, चिकन गुनिया 2 तर काही स्वाइन फ्लू सदृश्य रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या आजारांना नेमके जबाबदार कोण, नागरिक, नगरपंचायत की, ग्रामपंचायत प्रशासन, असा प्रश्न सध्या आरोग्य विभागासाठी संशोधनाचा ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह राजूर, अकोले शहरात मुख्य चौकांसह भरवस्तीतील अस्वच्छता, साठलेले डबके व कचराप्रश्नी सर्वस्वी नागरिकच जबाबदार असले तरी तोकडी यंत्रणाही तितकीच जबाबदार ठरत आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागासह शहरात डासांच्या त्रासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व ठिकाणी नगरपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाकडून मलमपट्टी करताना अडचणी येत आहेत. घरात कोणी आजारी पडले की, तात्पुरत्या होणार्‍या स्वच्छतेमध्ये सातत्य नसते. अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी यंत्रणा सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. दैनंदिन कचरा गाडी दारात येऊनदेखील रस्त्यावर कचरा फेकणारे काही नागरिक दोषी ठरत आहेत. स्वच्छता करणारी अकुशल तोकडी यंत्रणा व कचरा गाडीतील ओला-सुका कचरा विलगीकरणाची ओरड येथील आरोग्य बिघडवित असल्याचे वास्तव दिसत आहे.

जागोजागी कचर्‍याचे ढीग; साठले पाण्याचे डबके

दैनंदिन हजारो टन कचरा गोळा करून मोकळ्या मैदानात टाकण्याने समस्यांचे निराकरण होणार नाही, हे माहित असूनही आरोग्याच्या गंभीर - प्रश्नावर नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच, सदस्य, नगरसेवक, ना कचरावेचक वा ना प्रशासन ठोस मार्ग काढू शकले, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. नागरिक उघड्यावर कचरा का टाकतात, त्यांना सुविधा उपलब्ध नाहीत का, सुविधा उपलब्ध असूनही ते कचरा टाकत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत.

डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

अकोले तालुक्यात स्वाइन फ्लू, चिकनगुनिया, डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत आहे. डासांच्या त्रासांमुळे तापाने फणफणारे रुग्ण आढळतात. वाढत्या डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गणोरे व पाडाळणे गावातील स्वाइन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राजुर येथील एका स्वाईन फ्लू रुग्णावर संगमनेर येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्रातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवक ही सेवा पार पाडत असले, तरी डास निर्मितीला आळा घालण्यासाठी यंत्रणा कार्यरत नाही, हे विशेष! अकोले नगरपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाने ‘आरोग्य आपल्या हाती’ संकल्पना प्रामुख्याने राबवून आरोग्य हित जोपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘अकोले तालुक्यात चिकन गुनिया, डेंग्यू व स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत आहेत. पावसाळा सुरू असल्यामुळे घराजवळ स्वच्छता ठेवावी. पाण्याने भरलेले डबके साठू देऊ नये. पाणी साठविलेल्या भांड्यांवर झाकणे ठेवावे. डासांची अंडी व अळ्या तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, पाणी साठविण्याचे भांडे, टाक्या, ड्रम आठवड्यातून एकदा रिकाम्या कराव्या. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.

-शामकांत शेटे, तालुका आरोग्याधिकारी, अकोले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news