संगमनेर तालुक्यातील कोळवडे येथील एका आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनीने कॉपी केल्याच्या संशयावरून तिला मारहाण करण्यात आली. या विरोधात पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळवाडे येथील आश्रम शाळेत दि. 23 रोजी इयत्ता 5 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता. यावेळी पर्यवेक्षक असलेल्या महिला शिक्षकेला मागे बसलेल्या विद्यार्थ्यांने पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांनीने कॉपी केल्याचे सांगितले. याची कुठलीही शहानिशा न करता संबंधित शिक्षिकेने विद्यार्थीनीला मारहाण केली. याची माहिती पालकांना मिळाल्यानंतर ते शाळेत गेले. तेव्हा तेथील शिक्षकांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. यामुळे पालकांनी तेथे असलेले सीसीटीव्ही बघितले असता मारहाण केल्याचे उघड झाले.
तेथे असणार्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मोबाईलवरुन दिली असता ते शाळेत आलेच नाही. या बाबत विद्यार्थ्यांनीच्या पालकांनी मुख्याध्यापक आठवड्यातून एकदाच सही करण्यासाठी शाळेत येतात, कोणाचा वचक नाही, शिक्षिकेवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. मारहाण करणार्या शिक्षकेविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.