जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रकरणात सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी पाथर्डीच्या चार जणांना नोटीसा बजावल्याचे सूत्रांकडून समजले. विशेष म्हणजे हे चारही प्रमाणपत्र कर्णबधीर म्हणून दिलेले असून या चारही जणांचे दिव्यांगत्व हे 43 टक्के असे सारखेच असल्याचा खळबळजनक प्रकार दिव्यांग संघटनेने समोर आणला आहे.
राज्यातील बहुचर्चित बोगस दिव्यांग प्रकरणात अहिल्यानगरचे जिल्हा रुग्णालय हे चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या महिन्यात बोगस दिव्यांग प्रकरणात चार जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर एका संशयिताचा चौकशीदरम्यान मृत्यू झाल्याचेही पुढे आले. त्यातच कर्णबधीर दाखवलेले पाथर्डी तालुक्यातील तीन जणांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत 16 ऑक्टोबरला दिव्यांग संघटनेच्या वतीने बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.22) पाथर्डीच्याच आणखी एक प्रमाणपत्राबाबत अशी तक्रार दिलेली आहे. तक्रारीत डायग्नेसिस शीटवर दिव्यांगत्वाचा आजार नमूद नसतानाही या चौघांना समान असे 43 टक्के कर्णबधीर प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आणले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी त्याची गंभीर दखल घेत चौघांनाही खुलासा करण्याबाबत नोटीसा बजावल्याचे समजले. दरम्यान, आता हा खुलासा, प्रमाणपत्र देणारे तज्ज्ञ डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालयातील दस्तावेज, यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
दिव्यांग प्रमाणपत्राबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. आजही महापुरे यांच्याकडून आणखी एक तक्रार आली आहे. तक्रारीची सत्यता जाणून घेण्यासाठी संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक