राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगाराला तत्काळ नवीन बसगाड्या द्या, अन्यथा कालबाह्य झालेली एकही बस रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला. पाथर्डी आगाराच्या गलथान कारभाराविरोधात खासदार लंके, अॅड प्रताप ढाकणे यांनी आगार प्रमुखांना सोमवारी (दि. 23) घेराव घालत जाब विचारला. यावेळी बंडू बोरुडे, अरविंद सोनटक्के, दत्ता खेडकर, बाळासाहेब सोनटक्के, विष्णू थोरात, सोमनाथ माने, महेश दौंड, केशव खेडकर आदी उपस्थित होते.
पाथर्डी आगाराची दुरावस्था पाहून खासदार लंके यांनी संताप व्यक्त केला. हे आगारचच बंद करा, अशा शब्दात त्यांनी पाथर्डी आगाराचे प्रमुख आरिफ पाटील यांना सुनावले. पाथर्डी आगाला नवीन बसगाड्या द्या, अन्यथा एकही बस रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही इशारा लंके यांनी विभाग नियंत्रकांना दूरध्वनीवरून दिला.
पाथर्डी आगाराच्या बस कालबाह्य झाल्या असून, बसची क्षमता पाच ते सहा लाख किलोमीटरपर्यंत असताना त्या सहा, दहा, सोळा लाख किलोमीटर धावल्या आहेत. आगारातील सर्व 57 बसगाड्यांची रस्त्यावर धावण्याची क्षमता नसतानाही प्रवाशांचा जीवाशी एस टी महामंडळ खेळत आहे. बस वेळेवर सुटत नाहीत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना बसने प्रवास करावा लागतो. कधी वेळेवर बस मिळत नाहीत. त्यामुळे मुलींना तासन्तास ताटकळत बसावं लागते. काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. पाथर्डी आगाराला नवीन बसगाड्या मिळण्यासाठी मुख्यमंत्री व एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून नवीन बसगाड्यांचा प्रश्न मार्गी लावू. वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशाराही लंके यांनी दिला.
ढाकणे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वी पाथर्डीत नवीन स्थानकाची उभारणी केली. त्यानंतर या बसस्थानकाची कोणतीच सुधारणा झाली नाही. आगारात येण्यासाठी साधा रस्ता नाही, घाणीचे साम्राज्य पसरले असून, जुन्या बसस्थानकावर शौचालयाची व्यवस्था नाही. वाहक, चालकांना आराम करण्यासाठी व्यवस्था नाही. उत्पन्न देणार्या बसगाड्या बंद केल्या आहेत. त्या तत्काळ सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.
पाथर्डी आगाराला मिळालेल्या बसगाड्या दुसर्या तालुक्यातील नेत्यांनी पळविल्या. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांचा प्रवास खडतर झाला आहे. एसटीचा प्रवास सुखकर व शाश्वत राहिला नाही, अशी भावना यावेळी माजी नगरसेवक बंडू बोरुडे यांनी व्यक्त केली.