परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 21) कर्जत शहराला झोडपून काढले. जोरदार पावसामुळे मेन रोडवर पाणीच पाणी झाले. रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचे हाल झाले.
सोमवारी दुपारी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे कर्जत नगर या रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. पाण्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप आले होते. ग्रामीण भागाही जोरदार पाऊस झाला असून, या पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जत शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जमीन पडीक राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी असल्यामुळे शेतकर्यांना पेरण्यादेखील करता आल्या नाहीत. कोंबळी, वालवड, माहीजळगाव, चिंचोली, टाकळी परिसरामध्ये मात्र यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस पडला नाही.
तालुक्यातील काही तलाव ओव्हर फ्लो होऊन जून महिन्यापासून वाहत आहेत. काही भागातील पाझर तलाव अद्याप कोरडे आहेत, असे चित्र तालुक्यात पाहावयास मिळते. मात्र, पूर्ण भरून वाहणार्या तलावांची संख्या मोठी आहे.
सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे कर्जतकरांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. सोमवारी कर्जत शहराचा आठवडे बाजार होता. बाजार भरण्याच्या वेळीच जोरदार पावसामुळे विक्रेते व शेतकर्यांची मोठी दैना उडाली. बाजारतळावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठले होते. या जोरदार पावसाने काही विक्रेते. शेतकर्यांचा भाजीपाला पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली.
सध्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू आहे. परीक्षा पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी भर पावसामध्ये व पाण्यामधून वाट काढत घरी गेले. याचप्रमाणे आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून आलेले नागरिक, महिलांची पावसाने चांगलेच हाल झाले. शहरातील मेन रोडवर वाहतुकीची काही काळ मोठी कोंडी झाली होती.