नगर : पुढारी वृत्तसेवा नगर
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बाह्यवळण चौकात ड्युटी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला होमगार्डने इंद्रायणी चौकात अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली. पुन्हा शेंडी चौकात ड्युटीवर दिसल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाळू जाधव असे त्या होमगार्डचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल विवेक संजय वैष्णव (वय ३०) यांनी फिर्यादीत म्हटले, शेंडी बाह्यवळण चौकात ड्युटी करीत असताना ११ जुलै रोजी रात्री ९ वाजता होमगार्ड तेथे त्याच्या मोटारीतून आला.
त्याने अवजड वाहने बायपासने वळवू नको, शहरातून जाऊ दे असे म्हणाला. त्यावेळी रात्री १० पर्यंत अवजड वाहनांना शहरात बंदी असल्याचे त्याला सांगितले असता त्याने 'तू जास्त शहाणा झालास का? सांगितलेले कळत नाही का असे म्हणून शिवीगाळ करायला लागला.
अंगावर धावून येत तू साधा शिपाई आहेस, माझ्या नादाला लागू नको असे म्हणत धक्काबुक्की करून निघून गेला. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा शेंडी बायपास चौकात ड्युटीला गेलो असता बाळू जाधव पुन्हा तेथे आला आणि शिवीगाळ करू लागला. सहकारी पोलिस कॉन्स्टेबल खराडे तेथे आले असता बाळू जाधव तेथून निघून गेला.
त्याच दिवशी रात्री १० वाजता ड्युटी संपल्यावर घरी जात असताना हॉटेल इंद्रायणीजवळ बाळू जाधव याने त्यांना रस्त्यात अडवले. शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा या चौकात दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.