महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या निवासस्थानात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र विद्यापीठाच्या सुरक्षायंत्रणेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुरी विद्यापीठाच्या कुलसचिव पदावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, कुलसचिव निवासात चोरीच्या प्रयत्नाची माहिती पुढे आली आहे. कुलसचिव अरूण आनंदकर यांची नाशिक येथील महसूल विभागाला अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर निवास सोडताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
कुलसचिव आनंदकर यांच्या घराबाहेर लावलेली अप्पर जिल्हाधिकारी तथा कुलसचिव म्हणून नाव असलेली पाटी अज्ञात कोणीतरी तोडून नेल्याचे दिसले. तसेच घरालगतही चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्याशी संपर्क साधत चोरीची माहिती दिली. पोलिस ठाण्यात नेमकी तक्रार कोणी द्यायची यावर चर्चा होऊन या प्रकरणावर तिथेच पडदा टाकण्यात आला.
सुरक्षा व्यवस्थेवर न बोललेलेच बरे : तनपुरे
यापूर्वी सुरक्षा विभागातील वरिष्ठ अधिकार्याने एका शास्त्रज्ञावर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षायंत्रणेची विश्वासार्हतेबाबत बोलणेच चुकीचे ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक तनपुरे यांनी सांगितले.
मी निवास सोडत असताना माझ्या निवास परिसरात चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसले. माझ्या नावाची पाटी तोडून नेली होती. तसेच घरात घुसण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसताच सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकार्याच्या निवासस्थानात असे घडणे चुकीचे असल्याचे मत नाशिक महसूल विभागाचे अप्पर आयुक्त अरुण आनंदकर यांनी सांगितले.
शासकीय अध्यादेश व कुलगुरू यांच्या आदेशानुसार ज्या विभागाची किंवा ज्या संबंधी चोरी झाली आहे, त्या ठिकाणाच्या वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचार्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असा नियम आहे. त्यानुसार मी माजी कुलसचिव आनंदकर यांना पोलिस ठाण्यात चला, असे सांगितले होते. ते न आल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितले.