श्रीक्षेत्र नेवासा येथे 800 कोटी रुपये खर्चून ज्ञानेश्वर सृष्टी साकारली जाणार आहे. या संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करून अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे. जिल्हा मुख्यालय नगर नजीक चास परिसरात 350 कोटी रुपये खर्चाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक उभारले जाणार असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
आठशे कोटी रुपये खर्चून ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्याचा निर्णय झालेला आहे. याबाबत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात घोषणा झालेली आहे. त्यानुसार आराखडा तयार केला आहे. यामध्ये चारशे कोटी रुपयांचे प्रवरा नदीवर घाट बांधण्याचे प्रस्तावित आहे. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी ते पैठण आणि पैठण ते आळंदी असा त्यांनी केलेला प्रवास तसेच त्यांचे आध्यात्मिक कार्य या सृष्टीच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या पुढाकारात लवकरच राज्यभरातील सातशे ते आठशे कीर्तनकारांची बैठक आयोजित करुन संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारणीबाबत त्यांच्या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन महायुती सरकारने नगर जिल्ह्याचे व नगर शहराचे अहिल्यानगर असे नामकरण केले आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालय नजीक असलेल्या चास परिसरातील कृषी विद्यापीठाच्या 16 एकर जागेवर पुण्यश्लोक आहिल्यादेवींचे स्मारक उभारले जाणार आहे. साडेतीनशे रुपये खर्चाच्या आराखड्यात अहिल्यादेवींचा शंभर फुटी पुतळा आणि त्यांच्या कार्याची सृष्टी उभारली जाणार आहे. देशपातळीवर भव्य दिव्य ठरणारे या दोन्ही प्रकल्पांना चालना देण्याचे भाग्य मला मिळाल्याची भावना यावेळी विखे पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील उद्योग व्यवसायात गुंतवणूक वाढावी यासाठी ऑक्टोबर महिन्यात उद्योजक परिषद आयोजित घेतली जाणार आहे. औद्योगिक वसाहतींसाठी ठिकठिकाणी एकूण 1100 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली.
प्रत्येक तालुकास्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारके उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत या स्मारकांसाठी श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, जामखेड व पारनेर या पाच तालुक्यांत जागा उपलब्ध झाली आहे. या स्मारकांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उभारला जाणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नगर - शिर्डी रस्त्याचे कामे करतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ट्रॅफिक वॉर्डन नेमावे. अजूनही महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही, ते त्वरित करावे, असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री लाडक्या बहिणीमुळे इतर कोणत्याही योजनांवर परिणाम झालेला नाही. या योजनेमुळे बहिणींचा भावांवर विश्वास वाढला आहे. त्यामुळे विरोधक धास्तावले आहेत. अशी टीका ना. विखे यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, झेडपी सीईओ आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, भाजपा नेते विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
नेवासा फाटा येथे बुधवारपासून आरक्षणासाठी धनगर समाजातील सात जणांचे उपोषण सुरु झाले आहे. याकडे लक्ष वेधले असता महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, धनगर समाजाला इतर सवलती देण्याची कार्यवाही सुरु आहे. आरक्षण देण्याबाबत राज्यस्तरावर शासनाचा गंभीर विचार सुरु आहे. उपोषण हाच त्यावर एकमेव मार्ग नसल्याचे सांगत, उपोषण थांबवावे असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.