अहमदनगर : कोपरगावात सोमवारच्या आठवडे बाजारात भरदिवसा तरुणाचा खून - पुढारी

अहमदनगर : कोपरगावात सोमवारच्या आठवडे बाजारात भरदिवसा तरुणाचा खून

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा 

शहरात बाजारतळ भागात आठवडे बाजारात भरदिवसा दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ७ ते ८ जणांनी रॉड, फावड्याचा दांडा, गज व दगडाने ठेचून मारहाण करुन ३५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

राजा बबन भोसले (३५) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो शिंगणापूर येथील रहिवासी आहे. मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे,0 अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

दरम्यान, संतप्त जमावाने संत जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या तसेच भोसलेचा मृतदेह घेऊन येणार्‍या ॲम्बुलन्सच्या काचा फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या तरुणाला सात-आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली व दोन मोटारसायकली तेथेच सोडून पोबारा केला. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके चौफेर रवाना केली आहेत .

सोमवार हा कोपरगाव शहराचा आठवडी बाजार असतो या बाजारामध्ये दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते ज्या ठिकाणी घटना घडली तो बाजार तळाच्या मध्यवर्ती भागास खेटून जुन्या काले इमारतीच्या पश्चिम बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला.

भरदिवसा आठवडे बाजाराच्या भर गर्दीत या आजच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण कोपरगाव शहर हादरले आहे. काहीजण भयभीत झाले. काहींनी बाजारातून दूर जाणे पसंत केले. याप्रकरणी अद्यापही पोलीस ठाण्यात संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सणाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button