म्हाळुंगी पूल निधीवरून भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवाद

म्हाळुंगी पूल निधीवरून भाजप-काँग्रेसमध्ये श्रेयवाद

Published on

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने म्हाळुंगी नदीच्या नवीन पुलासाठी निधी मंजूर केला असून काम सुरू होणे अद्याप बाकी आहे. त्यापूर्वीच भाजप-काँग्रेस समर्थकांत श्रेयवाद सुरू झाला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात समर्थकांकडून निधी मंजुरीवरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पुलाचे श्रेय कुणीही घ्या, परंतु पुलाचे काम सुरू करण्यासाठी पुढाकार घ्या, अशी मागणी घोडेकर मळा पंपिंगस्टेशन व साईनगर परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे.
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नवीन पूल बांधावा, त्यासाठी निधी मिळावा म्हणून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यामुळे या पुलासाठी निधी मंजूर झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

विरोधक निधी मंजूर झाल्याचा दावा करत असेल तर त्यांनी पाठपुरावा केल्याचा पुरावा दाखवावा, असे आवाहन भाजपने पत्रकार परिषदेत केला. पुराव्यानिशी बोलत असून मंत्री विखे यांनीच निधी वळविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना केली. त्यानंतरच शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठीचा मंजूर निधी म्हाळुंगी नदी पुलासाठी वळविण्यात आला. त्यामुळे श्रेय भाजपचेच असे विखे समर्थक ठणकावून सांगत आहे. नदीवरील जुना पुल माजी खा. स्व बाळासाहेब विखे यांनी मंजूर करून बांधकाम केले होते. जुन्या-नव्या पुलाच्या बांधकाम निधीसाठी विखेंचे श्रेय असल्यानेच पुलास स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, जावेद जहागीरदार, राहुल भोईर यांनी सांगितले.

म्हाळुंगी नदी नवीन पुलास निधी मंजूर करून त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशा मागणीचे पत्र काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 30 नोव्हेंबर 2022 ला दिले होते. मात्र हा निधी मिळू नये, यासाठी भाजप नेत्यांकडून अडथळे आणत निधी अडविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रतिदावा आ. थोरात समर्थकांनी केला आहे. आता प्रत्यक्षात पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने भाजपचे श्रेयासाठी पुढे सरसावली आहे. 'त्यांनी' एक तरी चांगले काम केले का? असा सवाल उपस्थित करत फक्त पत्रकबाजी करण्यात तसेच खोट्या बातम्या पसरविण्यात ते पुढे आहेत.

भाजप नेत्याचे आणि पक्षाचे संगमनेरातील विकासकामांमध्ये योगदान काय?, असा परखड सवाल युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी उपस्थित केला. आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच म्हाळुंगी नदी पुलाचे काम होणार असल्याचे सर्व नागरिकांना माहिती आहे. भाजप नेत्यानी केलेल्या खोट्या प्रसिद्धीला संगमनेरकर भुलणार नाही, असे ही पापडेजा यांनी ठणकावून सांगितले.

'आम्ही संगमनेरकर पूल बनाव समिती'चेही योगदान
संगमनेर शहरातील साईनगर पंपिंगस्टेशन, घोडेकर मळा भागातील नागरिकांनी एकत्रित येत 'आम्ही संगमनेरकर पुल बनाव समिती'च्या वतीने आंदोलने केल्यानेच प्रशासनाला व सरकारला निधी मंजूर करण्यास भाग पाडले. तांत्रिक मंजुरीही मिळाली होती, परंतू पुलासाठी निधी मंजूर केल्याचा दावा करणारे भाजप, काँग्रेस पदाधिकारी श्रेयवादासाठी सरसावले आहेत. पुलाच्या कामासाठी निधी मिळविण्यात दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे जितके योगदान आहे, तितकेच आंदोलनकर्त्यांचेही आहे. त्यामुळे श्रेयावादावरून लढण्यापेक्षा आता प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या या नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news