Nagar News : मनपात आढळल्या 1175 कुणबी नोंदी

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागात कुणबीच्या 768, तर शिक्षण विभागात 407, अशा 1175 नोंदी आतापर्यंत आढळल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात सर्वत्र कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यात अहमदनगर महापालिकेत कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू असून, आतापर्यंत पावणे बाराशे कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेत कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी मोडी लिपी वाचकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या दप्तरातील कुणबी नोंदी शोध मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यावर सोपविण्यात आली होती. पठारे यांच्या आदेशानुसार जन्म-मृत्यू नोंद विभागातील दप्तर मनपाच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर 1903 ते 1923 पर्यंतच्या मोडी लिपीतील दप्तराची तपासणी करण्यात आली.
मोडी वाचक भोर यांनी वाचन करून नोंदी शोधल्या. त्यांना भिंगारदिवे यांनी सहकार्य केले. जन्म व मृत्यू नोंदणी विभागात आतापर्यंत 768 नोंदी आढळून आल्या आहेत. त्यात नगर शहरासह परिसरातील गावातील नोंदीचा समावेश आहे. सावेडी, भिंगार, बोल्हेगाव, बुरूडगाव या गावातील नोंदी आहेत. दरम्यान, जन्म व मृत्यू नोंदणी विभागाबरोबर शिक्षण विभागातही कुणबीच्या नोंदी शोधण्यात आल्या. त्यात आतापर्यंत 407 कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. शिक्षण विभागाात आणखी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू आहे. कुणबीच्या नोंदी आढळल्यानंतर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे स्कॅनिंग करून ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहेत.
हेही वाचा
Nagar News : पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसाचा धिंगाणा