नगर : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात पत्र्याच्या शेडमधील कापूस चोरून नेण्यास विरोध केल्याने शेतकर्याचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. भाऊसाहेब अशोक निकम (22, रा. लोहगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), अशोक संजय गिते (वय 23) व श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी (वय 20, दोघे रा. कडगाव, मिरी रोड, ता. पाथर्डी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. करण अजिनाथ कोरडे (रा. कडगाव, ता. पाथर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी, कडगाव येथील कारभारी रामदास शिरसाठ (वय 59) हे त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्याला राखण करण्यासाठी झोपले होते. 10 नोव्हेंबर 23 रोजी रात्री अनोळखी व्यक्तींनी शेडमधील कापसाच्या 7-8 गोण्या चोरून नेत असताना, कारभारी शिरसाठ यांनी त्यास विरोध केला. यावेळी चोरांनी मारहाण करून त्यांना ठार मारले. याबाबत त्यांची पत्नी सुमनबाई कारभारी शिरसाठ (वय 55, रा. कडगाव शिवार, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस पथकाने लागेच घटनास्थळास भेट देऊन परिसरात फिरून रेकॉर्डवरील आरोपी, कापूस विकत घेणारे व्यापारी व शेतावरील शेतमजुरांबाबत माहिती घेतली. त्यावरून त्यांना काही संशयितांची नावे समजली. त्यानुसार या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कारभारी शिरसाठ यांच्या शेतावर जाऊन पत्र्याच्या शेडमधील कापसाच्या गोण्या चोरून नेत असताना, ते झोपेतून उठल्याने व त्यांनी आरोपींना ओळखले. त्यामुळे त्यांचे नाक व तोंड दाबून ठार मारल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपींपैकी अशोक संजय गिते हा सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुध्द नगर, बीड, पुणे जिल्ह्यामध्ये चोरी व दुखापतीचे सहा गुन्हे दाखल आहेत..
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, पोलिस कर्मचारी मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, संतोष लोढे, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.