बस बंद पडल्याने चालक व वाहकाला उघड्यावर काढावी लागली दिवाळीची रात्र! | पुढारी

बस बंद पडल्याने चालक व वाहकाला उघड्यावर काढावी लागली दिवाळीची रात्र!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महामंडळाची पुणे – धुळे बस दुपारी तीन वाजताच कोल्हार बसस्थानकावर बंद पडली. रात्री उशीरापर्यंत बस सुरु झाली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत बस चालक आणि वाहकांना कोल्हार बसस्थानकावरच उघड्यावर शनिवारची दिवाळी रात्र काढावी लागली. एसटी महामंडळाच्या बस केव्हा बंद पडतील याचा आता भरोसा राहिला नाही. बस बंद पडली तर ती दुरुस्त करण्यासाठी महामंडळाकडूत तत्पर सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांचे बेहाल होत आहेत. पुणे – धुळे बस (एमएच 14, बीटी 1788) शनिवारी दुपारी 3 वाजता कोल्हार बसस्थानकावर ब्रेक लायनर खराब झाल्यामुळे बंद पडली.

त्यामुळे बसमधील प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसविण्यात आले. दुसर्‍या बसमध्ये जागा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चालक आणि वाहकांनी एसटी आगाराकडे मदतीची मागणी केली. परंतु रात्री उशीरापर्यंत बस सुरु झाली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत बस चालक आणि वाहकांना कोल्हार बसस्थानकावरच उघड्यावर शनिवारची दिवाळी रात्र काढावी लागली. दोनशे रुपयांपेक्षा अधिक पैसे जवळ ठेवता येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत खाण्या पिण्याचे हाल झाले. या कर्मचार्‍यांना बसचे राखण करीतच बसस्थानकावर रात्र काढावी लागली. रविवारी दुपारपर्यंत बस जागेवरच उभी होती. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचार्‍यांना सणासुदीच्या दिवशी देखील बाहेरच राहाण्याची वेळ येत आहे.

Back to top button