Nagar : चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

Nagar : चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारातील वस्तीवर कापसाची चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांनी तेथील शेतकर्‍यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
कारभारी रामदास शिरसाट (वय 55) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. कडगाव शिवारातील मोहजबुद्रुक-मिरी रस्त्यावर त्यांची वस्ती आहे. तेथे त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री चोरटे आले होते.

शेडमधील दहा-बारा कापसाच्या गोण्या या चोरट्यांनी उचलून नेऊन जवळच्या उसात ठेवल्या. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले कारभारी शिरसाट यांना जाग आली. त्यानंतर चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केल्याने या घटनेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना दुसर्‍या दिवशी शनिवारी शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर काही वेळातच पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, उपअधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देत, आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा गतिमान केली.

श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली.
कारभारी शिरसाट अतिशय कष्टाळू आणि गरीब शेतकरी होते. त्यांचा एक मुलगा सैन्य दलात आहे, तर दुसरा इंजिनियर आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती समजताच इंजिनियर मुलगा नगरहून कडगाव येथे आल्यानंतर कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कडगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

कापसासाठी घेतला शेतकर्‍याचा जीव

सध्या कापसाला सात हजार रुपयांहून अधिक भाव असून, ग्रामीण भागात कापूस वेचणी जोरात सुरू आहे. अनेक शेतकरी कापूस वेचून, तो घरामध्ये अथवा पत्र्याचे शेडमध्ये साठवून ठेवतात. चांगला भाव मिळाल्यानंतर तो विक्रीसाठी व्यापार्‍याकडे नेतात. याचाच फायदा उचलत शेतकरी शिरसाट यांनी शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी या कष्टकरी शेतकर्‍याचा जीव घेतला आहे.

हेही वाचा

Back to top button