महिला फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग | पुढारी

महिला फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  जेऊर पंचक्रोशीतील हजारो महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणाचा भांडाफोड दैनिक पुढारीने केल्यानंतर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महिलांच्या फसवणूक प्रकरणात सहभागी असणार्‍या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. सदर प्रकरण उघड केल्याबद्दल पंचक्रोशीतून ‘पुढारी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जेऊर, ससेवाडी, वाघवाडी, चापेवाडी, म्हस्के वस्ती, मेहत्रे वस्ती, नाईक मळा, शेटे वस्ती, फुलारे मळा तसेच पंचक्रोशीतील हजारो महिलांना मसाला कंपनीत नोकरी तसेच लॅपटॉप, स्कुटी मोपेड, घरकुल, सुकन्या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. गोरगरीब महिलांनी उसनवारी करत पैसे भरले. परंतु हा सर्व प्रकार बोगस असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

संबंधित बातम्या  :

सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी फसवणूक झालेल्या महिला एकत्र येणार आहेत. त्यानंतर चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नेत्यांनी हॉटेलवर पार्ट्या तसेच पैशाच्या आमिषापोटी गोरगरीब महिलांच्या घरावर सणासुदीत दरोडा टाकण्याचे काम केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महिलांच्या मजुरीमागे कमिशन, टॉवरसाठी जागा घेण्याच्या आमिषाने नेते भाळले अन् महिलांची मोठी फसवणूक झाली. मुख्य सूत्रधाराला मदत करण्यास जेऊर येथील चार, तर ससेवाडी येथील राजकीय व्यक्तीचे नाव समोर येत आहे.

मुख्य सूत्रधाराच्या कॉल डिटेल्सची तसेच तोतयासोबत फिरणार्‍या नेत्यांच्या बँक अकाउंटची तपासणी केल्यास यातील बरेच सत्य समोर येईल, अशी मागणी देखील महिलांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी संबंधित गाव नेत्यांकडे ऑनलाइन पैसे जमा केल्याची चर्चा आहे. दरम्यान, मसाला कंपनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगीसाठी कोणताही अर्ज आलेला नाही, तसेच कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. असा खुलासा सरपंच ज्योती तोडमल, उपसरपंच श्रीतेश पवार व काही ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे. सदर प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर जेऊर पंचक्रोशीसह संपूर्ण नगर तालुक्यातून सोशल मीडिया, मोबाईलद्वारे दैनिक पुढारीचे अभिनंदन करण्यात येत होते. फसवणूक झालेल्या महिला संपर्क साधून आमची कशाप्रकारे फसवणूक झाली त्याची माहिती प्रस्तुत वार्ताहराला देत होत्या.

स्थानिक मदतीशिवाय ‘गंडा’ अशक्य
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तोतया अधिकार्‍याला पूर्ण कल्पना होती की पैसे गोळा करण्यासाठी स्थानिक नेत्यांना हाताशी धरावे लागेल. त्यासाठी त्याने पार्टी, आर्थिक आमिष, कमिशन, जागा भाडेतत्त्वावर घेण्याचे, टॉवरचे आदी प्रलोभने दाखवली आणि त्यालाच भाळून नेत्यांनी गल्लोगल्ली मिटिंगा घेत पैसे गोळा करून दिल्याचे समजते.
दैनिक पुढारी वृत्तपत्रामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या होणार्‍या फसवणुकीच्या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळे यापुढे असे प्रकार होणार नाहीत. जेऊर परिसरातील प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. दैनिक पुढारीचे अभिनंदन.
-बाळासाहेब पवार, अध्यक्ष, एकलव्य संस्था, जेऊर

ग्रामपंचायतीतर्फे सदर प्रकरणी पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. गोरगरीब, मजुरी करणार्‍या महिलांच्या पैशावर डल्ला मारणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
-ज्योती तोडमल, सरपंच, जेऊर

Back to top button