धक्कादायक बातमी: संगमनेरच्या कारागृहातून चार कायद्यांचे पलायन | पुढारी

धक्कादायक बातमी: संगमनेरच्या कारागृहातून चार कायद्यांचे पलायन

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : येथील संगमनेर कारागृहाचे गज कापून संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील अत्याचार प्रकरणातील रोशन थापा ददेल अनिल ढोले, तालुका पोलीस ठाण्यातील खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि घारगाव पोलीस ठाण्यातील आत्महत्या करण्यास प्रवृत्त प्रकरणातील मच्छिंद्र जाधव असे चार कैदी पळाले असल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  त्यामुळे पोलीस प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या लगत कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृह बनविण्यात आले आहे. या कारागृहात सध्या संगमनेर शहर तालुका घारगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कैदी ठेवले जात आहे.  सध्या मात्र कोपरगाव कारागृहाचे काम सुरू असल्यामुळे कोपरगाव व शिर्डीमधील अनेक कैदी संगमनेरच्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे.  मध्यंतरी दोन ते तीन वेळा शिर्डीच्या कैद्यांनी कारागृहाच्या बंदोबस्तावरती असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच धमक्या देण्याचे प्रकारही घडलेले आहे.

याबाबत कारागृह बंदोबस्तावरील पोलीस  कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना या गोष्टींची कल्पना दिली होती परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल न घेतल्यामुळे आरोपींचे चांगलेच फावले आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी चर्चा आता सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.
संगमनेर कारागृहाच्या बंदोबस्तासाठी बुधवारी पहाटेपर्यंत जेल गार्ड म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे राजू गोडे, घारगाव पोलीस कर्मचारी राजेंद्र मेंगाळ आणि महिला पोलीस कर्मचारी भांगरे यांची कारागृह रक्षक म्हणून नेमणूक करण्यातआली होती.

पोलीस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री कैंद्यांची मोजदाद केली असता संख्या बरोबर होती. त्यानंतर पोलीस कर्मचारी निवांत राहीले. या दरम्यान पलायन करणाऱ्या कैद्यांनी कारागृहातील इतर कैदी झोपेत असताना कारागृहाचे गज कापून बुधवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पलायन केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा कारागृह निरीक्षक पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तात्काळ कारागृहाला भेट देत पाहणी केली.

पळून गेलेल्या कैद्यांच्या शोधासाठी चार ते पाच पथके रवाना केले असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. हे मोठ्या गुन्ह्यातील आरोपी असून कोणाला आढळल्यास संगमनेर शहर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन मथुरे यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button