Nagar News : शेतकर्‍यांची मका काढणीची लगबग | पुढारी

Nagar News : शेतकर्‍यांची मका काढणीची लगबग

रूईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील रूईछत्तीशी, वाटेफळ, मठपिंप्री, हातवळण, वडगाव, गुणवडी परिसरात सध्या मका काढणीला वेग आला आहे. उशिरा झालेल्या पावसाने खरीप हंगामातील मका पीक बहरले होते. मृग व रोहिणी नक्षत्रात पाऊस न पडल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र, नंतर पाऊस झाल्याने खरीप हंगामाने जोर धरला होता. आता सध्या सर्वत्र मका कढणीची लगबग सुरू असून, रब्बी हंगामातील हरभरा पिकावर शेतकर्‍यांची मदार असणार आहे.

जास्त पाऊस नसल्याने पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे गहू, कांदा ही पाण्यावर आधारित पिके जास्त घेतली जाणार नाहीत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पन्न साधणार नाही. अजून एक महिन्यात पाण्याचा उपसा होणार असल्याने शेतकर्‍यांना मोठा दुष्काळ जाणवणार आहे. हरभरा पिकाला एक किंवा दोन पाणी दिले तरी पीक जोमाने येते. यंदा हरभरा पिकाचा पेरा वाढणार आहे. मक्याचे उत्पन्न चांगले होणार असल्याने रब्बीपेक्षा खरीप हंगाम शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणार आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या चार्‍याची अडचण येणार असल्याने मक्याची भुकटी करून साठवून ठेवली जाते. उन्हाळ्यात जनावरांना हेच खाद्य वापरले जाते. सध्या थंडीचा जोर वाढल्याने हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर पीक बहरणार आहे. अजून आठ ते दहा दिवसांत शेताची पूर्णपणे मशागत झाल्यानंतर हरभर्‍याची पेरणी सुरु होणार आहे.

जानेवारीत येणार पाण्याची अडचण
जानेवारी महिन्यात पाण्याची अडचण येणार असल्याने यंदाचा उन्हाळा भीषण जाणार आहे. जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. दूध व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. रब्बी पेरणीसाठी शेतातील मक्याचे पीक काढून शेत मोकळे केले जात आहे.

Back to top button