Nagar News : अखेर मानोरीतील जबरी चोरीतील दोघे जेरबंद | पुढारी

Nagar News : अखेर मानोरीतील जबरी चोरीतील दोघे जेरबंद

राहुरी: पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरातील गणवाडी येथील एका वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून दोघांनी जबरी चोरी केली होती. महिलेला रक्तभंबाळ करीत चोरट्यांनी तोंडामध्ये कापडी बोळा कोंबत गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती पो. नि. धनंजय जाधव यांनी दिली.
गणपतवाडी (मानोरी) येथील लक्ष्मण खामकर हे महावितरणमध्ये अभियंता आहेत. त्यांचा बंगला शेती क्षेत्रात आहे. दि. 21 ऑक्टोंबर रोजी पत्नी व मुलीसमवेत पारनेर तालुक्यात तुकाई देवीच्या दर्शनास गेले होते. घरी वृद्ध आई असल्याचा लाभ घेत दोघे भामटे दुचाकीवर आले.

बंगल्याची बेल वाजविल्यानंतर सरुबाई खामकर (वय 65) यांनी दरवाजा उघडला. दोघांनी घरात प्रवेश करताच वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबत बेदम मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सरूबाई यांच्या गळ्यातील दागिणे ओरबडून नेत आरोपींनी धूम ठोकली. या घटनेनंतर तत्काळ पो. नि. धनंजय जाधव, उपनिरीक्षक पोपट कटारे, स. फौजदार म्हातारबा जाधव, पो. हवालदार प्रमोद ढाकणे यांनी घटनास्थळ गाठत घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. सीसीटिव्ही तपासणी केली असता खामकर यांच्या घरातील कॅमेरे 13 तारखेपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिसांपुढे घटनेतील आरोपींचा शोध लावणे मोठे आव्हानात्मक होते.

श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथकाने पाहणी करूनही आरोपींचा माग मिळणे कठीण होता. पो. नि. जाधव यांनी घटनेबाबत तपास हाती घेत परिसरातून काही सीसीटिव्हीचे कॅमेर्‍यांची माहिती मागविली. यानंतर आरोपींवर संशक बळावल्यानंतर सोशल मीडिया व मोबाईल फोन वापराची माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषन व लोकांकडून माहिती घेत पोलिसांनी आरोपींचे नावे निष्पन्न केली. रोहित एकनाथ कानडे (24 वर्षे) गणेश सुनिल लोंढे (22वर्षे) दोघे रा. चिंचोली, फाटा ता. राहुरी यांनी जबरीचोरी केल्याचे निष्पन्न झाले.

पो. नि. जाधव यांसह पो. उ. नि. कटारे, पो. हवालदार सोमनाथ जायभाय, पो. नाईक राठोड, अजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके, सचिन ताजणे यांच्या पथकाने दोघा आरोपींना चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. घरातील सीसीटिव्ही कॅमेरा बंद असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.

कानडे हा सरूबाई खामकर यांच्या नात्यात असल्याने पोलिसांनी आरोपीच्या दुरध्वनी क्रमांकाची तपासणी केली. अखेर पोलिसांचा संशय सत्य ठरला. चोरीमध्ये दोघा आरोपींचे नावे निष्पन्न होताच चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून त्यांना शिताफिने पकडण्यात आले. गणेश लोंढे यास न्यायालयात हजर केले असता 3 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहित कानडे यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पो. नि. जाधव म्हणाले. गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागिय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनात पो. उ.नि. कटारे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button