टाकळीभान(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : 15 ऑँगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात न आल्याने काल आयोजित केलेल्या ग्रामसभेला महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रामसभा सुरू होताच सर्वच प्रभागातून आलेल्या महिलांनी माईकचा ताबा घेवून पाणी प्रश्न व घरकुल प्रश्नावर हल्लाबोल करीत सारा परिसर दणाणून टाकला. तर बापूसाहेब नवले यांनी हंडा, कळशी आणून ग्रामसभेत प्रवेश केला व या भांड्यांचा आवाज करून 'पाणी द्या, पाणी,' अशी मागणी केली. पाणी देता येत नसेल तर नैतीक जबाबदारी म्हणून सर्व सदस्यांनी राजीनामे देण्याची मागणी केली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांनी अहवाल वाचन केले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, आज लोकांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोकांना पिण्याचे पाणी उपल्बध करून देणेकामी ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने अगोदर ग्रामपंचायतीने प्राधान्याने येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थितरित्या करावा, असे आवाहन केले.
यावेळी अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोकचे कारेगाव भाग संचालक शिवाजी शिंदे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, माजी उपसरपंच भारत भवार, पाराजी पटारे,अविनाश लोखंडे, प्रा.जयकर मगर, यशवंत रणनवरे आदी उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, चार वर्षापासून आपली चारशे घरकुले रखडली आहे. त्यातली फक्त 115 घरकुले झाली आहेत. उर्वरीत घरकुलांसाठी शासनाने या घरकुलाबाबत स्वत:ची जागा पाहीजे अशी अट घातल्याने काही लोकांची घरकुल राहीले. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक होऊन आहे त्या जागेवरच बांधून मिळण्याबाबत चर्चा झाली. लवकरच या घरकुलांचे कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटलांच्या हस्ते करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले की, भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य लक्षात घेता भंडारदरा धरणाच्या खाली होणार्या पावसाचे पाणी तसेच धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून टाकळीभान टेलटँक अगोदर भरून घ्यावा. व नंतर निळवंडे धरण भरण्यात यावे, असा ठराव मांडला. उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सध्यस्थितीत येथील बाजारसमितीकडे असणारी बाकी वसूल करण्यात यावी.
तसेच पेठेतून गेलेल्या मेनलाईनला अनधिकृत नळ कनेक्शन आहे. ते कन्केशन बंद करावे किंवा त्यांच्यावर कारवाई करावी. जेणेकरून बाकी लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. ग्रामसभेत राहुल पटारे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, नारायण काळे, बापूसाहेब शिंदे, अनिल बोडखे, आण्णासाहेब दाभाडे, बापू नवले, रामभाऊ आरगडे, सुप्रिया धुमाळ, देवा कोकणे, संजय रणनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या ग्रामसभेत पहिल्यांदाच महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपल्या समस्यांचा पाढाच या ठिकाणी वाचून दाखविला. प्रत्येक वार्डातून आपआपल्या अडचणी घेवून महिला वर्ग या ठिकाणी सत्ताधार्यांना जाब विचारण्यासाठी आल्या होत्या. महिलांनी एकामागून एक प्रश्नांची शरबती सत्ताधार्यांवर केली. त्यामुळे सत्ताधार्यांची यावेळी चांगलेच भंबेरी उडाली. आक्रमक झालेल्या महिलांना उत्तर देण्यात सर्वांचीच तारांबळ होताना दिसली.
हेही वाचा