अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने कांदा निर्यात शुल्क थेट 40 टक्के केल्याने या निर्णायाच्या विरोधात जिल्ह्यामध्ये पडसाद उमटू लागले आहे. केंद्र शासनाच्या कांदा निर्यात शुल्कवाढीच्या निर्णयाच्या प्रतिकात्मक आदेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी होळी केली. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शेवगाव बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये केंद्र सरकारच्या जाचक निर्णयाच्या प्रतिकात्मक आदेशाची होळी केली. यावेळी कांद्याचे लिलाव बेमुदत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन खरेदीदारांना दिले.
यावर्षी शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. एप्रिल महिन्यात तालुक्याच्या काही भागात झालेली अतिवृष्टी व यंदा कमी प्रमाणात झालेला पाऊस, यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे. नुकतेच काही प्रमाणात कांद्याला चांगला भाव मिळून उत्पादक शेतकर्यांना त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली असताना केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा फटका थेट उत्पादक शेतकर्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे.
निर्यात शुल्कवाढीच्या आदेशानंतर कांद्याचे भाव कोसळले आहेत. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली. त्याची निगा ठेवली. मात्र, भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना समस्यांना सामना करण्याची वेळ आली आहे. शेवगाव बाजार समिती प्रांगणातील कांदा खरेदीदार व्यापार्यांनी शेतकर्यांच्या बाजूने ठामपणाने उभे राहून कांदा खरेदी विक्री बंद ठेवावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, मधुकर पाटेकर, बाळासाहेब तेलोरे, संतोष घाडगे, अक्षय लेंडाळ, बापूसाहेब गवळी, राजेंद्र आवटी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्याच्या निषेधार्थ पारनेर बाजार समितीत शेतकरी व व्यापार्यांनी काही काळ बाजार समिती बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवीला. बाजार समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर कांद्याचे लिलाव सुरू होण्याआधी शेतकरी व व्यापार्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन निर्यात शुल्क वाढीसंदर्भात केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
शेतीमालाला आधीच बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच कांदा व टोमॅटो सारख्या शेतीमालास भाव मिळत असल्याने केंद्र सरकारकडून निर्यात शुल्कवाढ झाल्याने सर्वच शेतीमालाचे भाव पडणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याची भावना शेतकर्यांनी व्यक्त केली.
बाजार समिती ही शेतकरी व व्यापार्यांनी कामधेनू असून अशा सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे दोन्ही वर्गाचे अतोनात नुकसान होणार आहे. शेतकर्यांनी आता संघटित होऊन अशा निर्णयाविरोधात लढा उभारला पाहीजे. निर्यात शुल्क वाढविल्यावर आपोआपच शेतीमालाचे भाव गडगडणार आहेत. यातून या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठा फटका बसणार आहे. अशा प्रतिक्रिया शेतकरी व व्यापार्यांनी व्यक्त केल्या. यावेळी गणेश मापारी, कैलास कोल्हे, शंकर चौधरी, संपत उगले, सुभाष सरोदे, धीरज मंहाडुळे, तुकाराम पडवळ, तसेच व्यापारी मारुती रेपाळे, राजेंद्र तारडे, पोपट तारडे, किसन गंधाडे, चंदन भळगट, उत्तम गाडगे, चेतन भळगट आदी उपस्थित होते.
आंदोलनाच्या वेळी काही शेतकरी व व्यापार्यांनी शेतकरी संघटना व नेते निर्यात शुल्कवाढी दरम्यान कुठ गेले असे प्रश्न विचारून एअर कंडिशनरमध्ये बसून शेतकर्यांचे प्रश्न सुटत नसतात असा सवाल शेतकर्यांनी केला.
हेही वाचा