अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. गुंडगिरी करणार्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अधिकार्यांना आदेश दिले आहेत. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एका लुटारूचा रात्रीच्या सुमारास दोन तास पाठलाग करून पकडले. 'कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल' असा इशाराच पोलिसांनी गुन्हेगारांना आपल्या कारवाईतून दिला आहे.
अकिब ऊर्फ चुस्या जिशान सय्यद (वय 30, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरात भगवंत नागराज थोरात (वय 42) या नाशिकच्या प्रवाशाला मारहाण करून त्याचे पाच हजार रुपये व मोबाईल दोन लुटारूंनी लांबवला होता. निरीक्षक यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. गुन्हा अकिब सय्यद याने केला असून, तो पुणे बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच यादव यांनी पथकासह सापळा लावला.
मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोन आरोपींनी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक यादव व त्यांच्या पथकाने आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या. आरोपी सय्यद याने त्याचा साथीदार जाबीर ऊर्फ जानू सादिक सय्यद (रा. शाहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भांसी करीत आहेत.
दोन्ही आरोपी पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मोपेड दुचाकीवरून पळाले. पण यादव यांनी आरोपींच्या मागे व्हॅन पाठवली आणि त्यांना पकडले. यादव यांच्यासह पोलिस शिपाई रिंकू काजळे, सतीश भांड, संतोष जरे, सलीम शेख या पथकाने माळीवाडा, हातमपुरा, सहकार सभागृह, महात्मा फुले चौक, सारसनगर असा पाठलाग करून आरोपीला पकडले.
हेही वाचा